भजेपार येथे ‘ईको फ्रेंडली’ जन्माष्टमी !

0
15
वाढदिवसाच्या शुभेच्छा

कृत्रिम टाक्यात निर्माल्य गोळा करून खत निर्मितीचे नियोजन

सालेकसा: तालुक्यातील भजेपार येथे ‘माझी वसुंधरा अभियानांतर्गत ‘ईको फ्रेंडली’ जन्माष्टमी साजरी करण्यात आली. दरम्यान नदी, नाले, तलावात निर्माल्य विसर्जित न करता ग्राम पंचायतीच्या वतीने उपलब्ध करून दिलेल्या कृत्रिम टाक्यात नागरिकांनी निर्माल्य गोळा करून पर्यावरण संवर्धनाचा ध्यास घेतला. या निर्माल्यातून खत निर्मिती करून त्यांचा वापर झाडांसाठी करण्यात येणार आहे हे विशेष.
धार्मिक सण उत्सवात पूजा केल्यानंतर फुले, पाने, हार, भुजली आदि निर्माल्य थेट नदी, नाले, तलावात विसर्जीत केल्याने पाणी प्रदूषित होत असते. ही बाब लक्षात घेता भजेपार ग्राम पंचायतीने पुढाकर घेत गावातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, दुर्गा मंदीर चौक, संत गाडगेबाबा चौक, माताबोडी परिसर आणि नदीटोला येथील अंगणवाडी परिसरात ‘कृत्रिम निर्माल्य विसर्जन टब’ उपलब्ध करून दिले. याला प्रचंड प्रतिसाद देत भाविकांनी निर्माल्य गोळा करून इको फ्रेंडली पद्धतीने कृष्ण जन्मोत्सव साजरा केला. संग्रहित केलेल्या निर्माल्याचे खत निर्माण करून झाडांसाठी त्याचा वापर करणार असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे. या उपक्रमाला यशस्वी करण्यासाठी स्थानिक ग्राम पंचायतीला महात्मा गांधी तंटामुक्त समिती, शाळा व्यवस्थापन समिती, अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ,स्वामी विवेकानंद अध्ययन कक्ष, भजेपार शिक्षण कल्याण संघ, चौरागड आश्रम समिती, सूर्योदय क्रीडा मंडळ, सर्व महिला पुरुष बचत गटासह संपूर्ण गावकऱ्यांचे सहकार्य लाभले.