भंडारा जिल्ह्यात पूरस्थिती, आंतरराज्यीय मार्गासह १८ मार्ग वाहतुकीसाठी बंद

0
12

बिटीबी बाजार आणि महिला रुग्णालयात शिरले पाणी

भंडारा : जिल्ह्यात सध्या पूरस्थिती निर्माण झाली असून नद्या, नाले, तलाव ओसंडून वाहत आहेत. त्यामुळे आज सकाळी महाराष्ट्र- मध्यप्रदेश ला जोडणाऱ्या आंतरराज्यीय मार्गासह १८ मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत.महाराष्ट्र – मध्यप्रदेश या दोन राज्यांना जोडणाऱ्या आतंरराज्यीय पुलावरून बावनथडी नदीचे पाणी वाहत असल्याने महाराष्ट्र – मध्यप्रदेश राज्याचा संपर्क तुटला आहे.

भंडारा शहरात बिटीबी बाजारात पाणी शिरल्याने बाजार बंद आहे. तसेच बिटीबी मार्केटलगत बांधण्यात आलेले शासकीय महिला व बाल रुग्णालयातसुद्धा पुराचे पाणी शिरले आहे. सध्या आत प्रवेश करता येत नाही.

संपूर्ण रस्त्यावर दवाखान्यासमोर पाणी साचलेले आहे व पाण्यामध्ये सातत्याने वाढ होत आहे. मात्र आजवर पूर परिस्थिती निर्माण झाली की सरकारी दवाखाना परिसर, अशोका हॉटेल व स्मशान घाट असा सर्व परिसर बुडतो. महिला रुग्णालयासाठी चुकीची जागा निवडण्यात आल्याने पुराच्या वेळी हा दवाखाना बंद ठेवण्याची वेळ येणार आहे. त्यामुळे कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या महिला रुग्णालयाचा मुद्दा कायम चर्चेचा विषय ठरतो.

याशिवाय पवनी तालुक्यातील गुडेगाव, उमरी,  जुनोना , माहुली, रेवनी ते कोदुली मार्ग,शहरातील लहान पुल वैनगंगा, बीटीबी मार्केट, भोजापुर नाला, मोहाडी तालुक्यात रोहा सुकळी, मांढळ ते सुकळी, महालगाव ते मोरगाव, तुमसर तालुक्यातील तुमसर ते येरली, तुमसर ते पीपरा, तामसवाडी ते उमरवाडा, सिहोरा क्षेत्रातील बपेरा पुल, सिलेगाव पुल, कारधा लहान पुल वैनगंगा खमारी नाला, वरठी, करडी, दाभा ते कोथूर्णा असे मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.