साकोलीत नाटयगृह उभारणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
5

साकोली, दि.7 : स्थानिक कलावंतांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळण्यासाठी साकोली येथे शासनातर्फे नाट्यगृह उभारण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज  साकोली येथील खासदार सांस्कृतिक महोत्सवाच्या  कार्यक्रमात केली.

यावेळी व्यासपीठावर भंडारा -गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार सुनील मेंढे ,तिरोड्याचे आमदार विजय रहांगडाले, माजी राज्यमंत्री डॉ.परिणय फुके,भंडारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, गोंदिया जिल्ह्याचे जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

भंडारा-गोंदिया क्षेत्रामध्ये  झाडीपट्टीतील दंडार, खडी गंमत , मंडई, या लोककलांचा समृद्ध वारसा लाभला आहे. या लोककला संवर्धनासाठी  खासदार सांस्कृतिक महोत्सव हे उत्तम व्यासपीठ असल्याचे श्री.फडणवीस म्हणाले. आदिवासी समाजाने नृत्य, कला ,गायन, नाट्य यासह झाडीपट्टीतील वैशिष्ट्यपूर्ण  लोककलेला जिवंत ठेवले आहे.

आदिवासी तरूणाईच्या याच कलागुणांना वाव मिळण्यासाठी साकोलीला नाट्यगृह असावे ,अशी अपेक्षा खासदार सुनील मेंढे यांनी व्यक्त केली .त्यावर उपमुख्यमंत्री महोदयांनी लवकरच साकोलीत नाट्यगृह उभारणार असल्याचे आश्वस्त केले व जिल्हाधिकाऱ्यांनी यासाठी जागेचा प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.

भंडारा-गोंदियाच्या विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध असून  साडेचारशे कोटी प्रकल्प किमतीच्या गोसेखुर्दच्या जल पर्यटन प्रकल्पालामुळे जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळेल. या जलपर्यटन प्रकल्पामुळे भंडारा – नागपूर जागतिक पर्यटनाच्या नकाशावर  येणार आहे.यामुळे स्थानिकांना रोजगार संधी उपलब्ध होतील,असे श्री.फडणवीस यांनी सांगितले.

गोसेखुर्द प्रकल्पाचे  उर्वरित कामकाज लवकरच पूर्ण करण्यात येईल. आणि धापेवाडा बॅरेजच्या दुस-या टप्प्याचे कामही गतीने करण्यात येणार असल्याचे श्री.फडणवीस यांनी सांगितले. शेतकऱ्यांसाठी विविध योजना राज्य शासन मोठ्या प्रमाणात राबवत असून त्यामध्ये मागेल त्याला शेततळे, जन आरोग्य योजनेअंतर्गत पाच लाख रुपयांपर्यंतचे  मोफत उपचार ,शेतकऱ्यांसाठी एक रुपयात पिक विमा यांचा लाभ राज्यातील जनतेला होत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वात भारत जागतिक पटलावर अग्रेसर आहे असल्याचे त्यांनी सांगितले.वैनगंगा- पांगोली खासदार सांस्कृतिक महोत्सवाचे प्रास्ताविक स्वर्गीय बाबुराव मेंढे प्रतिष्ठानच्या अध्यक्षा शुभांगी मेंढे यांनी केले. प्रास्ताविकात या आयोजनामागची भूमिका त्यांनी विषद केली.

खासदार सुनील मेंढे यांनी देखील यावेळी खासदार सांस्कृतिक महोत्सवाअंतर्गत राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची  माहिती  दिली. खासदार सांस्कृतिक महोत्सवात आधी तालुकास्तरावर नृत्य स्पर्धांचे आयोजन करण्यात आले .तालुकास्तरावरील विजेत्यांना जिल्हास्तरावर व जिल्हास्तरावरील विजेत्यांना लोकसभा स्तरावर सादरीकरण करण्यात आले. ब्रिटन गॉट टॅलेंट या स्पर्धेत चमकलेल्या मुंबईच्या सुप्रसिद्ध एक्स वन एक्स वन या डान्स ग्रुपने चित्तथरारक नृत्याविष्कार यावेळी सादर केला .तसेच स्थानिक कलावंतांनीदेखील या वेळेस नृत्याविष्कार सादर केले.विजेत्या चमूंना  उपमुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.