९५ जागांकरिता आले तब्बल ११०६ अर्ज , ४७ अर्ज झाले बाद
= रंणांगणात आता १०५९ उमेदवार =
९ ऑक्टोंबर पासून प्रवेशपत्र ऑनलाइन उपलब्ध ,अर्जुनी मोरगाव येथे दोन केंद्रावर होणार परीक्षा
अर्जुनी मोर.( सुरेंद्रकुमार ठवरे)-उपविभागीय कार्यालय अर्जुनी मोरगाव अंतर्गत सडक अर्जुनीच्या २७ तर अर्जुनी मोरगाव तालुक्यातील ६८ पोलीस पाटील पदाकरिता ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले होते त्यानुसार दोन्ही टप्प्यात ११०६ अर्ज प्राप्त झाले विभागाच्या वतीने ऑनलाइन अर्जाची पडताळणी नंतर अंतिम उमेदवार यादी जाहीर झाली त्यात १०५९ उमेदवारांचे अर्ज पात्र ठरले असून ४७ उमेदवारांना अपात्र करण्यात आले आहे. दि. १५ ऑक्टोंबर रोजी स्थानिक अर्जुनी मोरगाव येथे दोन केंद्रावर ही लेखी परीक्षा घेण्यात येणार असून दि. ९ ते १५ ऑक्टोंबर दरम्यान परिक्षार्थी उमेदवारांना प्रवेशपत्र ऑनलाइन उपलब्ध होणार आहेत. अशी माहिती उपविभागीय अधिकारी वरुणकुमार शहारे यांनी दिली.
२१ ऑगस्ट रोजी २०११ च्या जनगणनेच्या लोकसंख्येला अधिकृत धरून पोलिस पाटील पदाचे आरक्षण सोडत घेण्यात आली. जागा निश्चित करून ८ सप्टेंबर ते २० सप्टेंबर या कालावधीत उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले. त्यानुसार आलेल्या अर्जाची विभागाच्या वतीने पडताळणी केली त्यात ९४३ अर्ज पात्र , तर ७२ अर्ज त्रुट्या व पुराव्या अभावी प्रलंबित ठेवण्यात आले आणि ४३ उमेदवारांचे अर्ज अपात्र करण्यात आले होते. यावेळी अनेक उमेदवारांनी आक्षेप घेतला त्या आक्षेपांची तलाठी तथा ग्रामसेवक यांच्या स्थानिक पंचनाम्या आणि अहवालावरून शहानिशा करून घेतल्यानंतर बहुतेक प्रलंबित आणि अपात्र ठरलेले उमेदवार पात्र ठरले होते. तर काही अर्जांवर गावकऱ्यांनी आक्षेप घेतला असे अर्जही अपात्र करण्यात आले आहेत. मात्र निघालेल्या आरक्षणानुसार त्या १३ गावातून एकही अर्ज न आल्यामुळे तर १ गावामध्ये आलेल्या अर्जातील दोन्ही उमेदवार सबळ पुराव्या अभावी अपात्र ठरल्याने त्या एकूण १४ गावांकरिता शासन निर्णयानुसार नव्याने आरक्षणाची अदलाबदल करून अर्ज मागविण्यात आले. त्यात नवीन १६३ उमेदवारांची भर पडली दोन्ही टप्यात आलेल्या ११०६ अर्जापैकी ४७ अर्ज अपात्र ठरविण्यात आले आणि अखेर ९४ पोलीस पाटील पदांच्या जागे करिता १०५९ उमेदवार पात्र ठरले उमेदवारांना प्रवेशपत्र विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध होणार असून १५ ऑक्टोंबर रोजी दुपारी १.३० ते ३ या वेळेत अर्जुनी मोरगाव येथील सरस्वती विद्यालय तथा शिवप्रसाद सदानंद जायस्वाल महाविद्यालयात अशा दोन केंद्रावर लेखी परीक्षा निश्चित करण्यात आलेली आहे. लेखी परीक्षा ही ८० गुणांची असून प्रत्येक प्रश्नाला १ गुण असेल. त्यांनंतर ४५ टक्के गुण घेणाऱ्या उमेदवारांना मुलाखती करिता बोलविण्यात येईल मुलाखत ही २० गुणांची असणार आहे.
बाम्हणी खडकी येथे तात्पुरती स्थगित
सडक अर्जुनी तालुक्यातील बाम्हणी खडकी येथे निघालेल्या आरक्षणानुसार सदर जागा विमुक्त जाती (अ ) करिता राखीव ठेवण्यात आली होती. या ठिकाणावरून दोन उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले होते. या अर्जावर गावकऱ्यांनी आक्षेप घेतल्यानंतर हे दोन्ही अर्जाच्या पुराव्यांची उपविभागीय कार्यालयाच्या वतीने पडताळणी केल्यानंतर दोन्ही अर्जादारांचे पुरावे अपुरे आढळून आले. पात्र झालेल्या दोन्ही उमेदवारांना सखोल चौकशीअंती अपात्र ठरविण्यात आले त्यामुळे या जागेची परीक्षा तात्पुरती स्थगित करण्यात आली त्यामुळे आता ९४ जागांकरिता १०५९ उमेदवारांमध्ये लेखी परीक्षा पार पडणार आहे.
“ पोलिस पाटील पदांची परीक्षा अतिशय पारदर्शक पार पडणार आहे. उमेदवारांनी प्रवेशपत्रात दिलेल्या अटी आणि शर्ती वाचून त्याचे काटेकोर पालन करून ,विहित वेळेत परीक्षा केंद्रावर पोहचावे, संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन असल्यामुळे उमेदवारांचा बराच वेळ वाचला आहे.” – वरुणकुमार शहारे उपविभागीय अधिकारी अर्जुनी मोरगाव