यवतमाळ, दि.१२ : नेर एमआयडीसीत व्ही-तारा कंपनीची मोठी फॅक्टरी येणार असून पाच हजार कोटींची गुंतवणूक होणार आहे, अशी माहिती पालकमंत्री संजय राठोड यांनी आज दिली.
नेर तालुक्यातील पिंपरी कलगा, दगड धानोरा आणि वटफळी येथील विविध विकासकामांच्या भूमिपूजन व लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी विविध विभागाचे अधिकारी, पंचायत समितीचे माजी सभापती नामदेव खोब्रागडे, सरपंच जया तुपटकर, सदस्य भास्कर तुपटकर, एपीएमसी नेरचे अध्यक्ष मनोज नाले, ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. राठोड पुढे म्हणाले, समृद्धी महामार्गामुळे उद्योगांना चालना मिळत आहे. या महामार्गलगत असलेल्या नेरमध्ये मोठी एमआयडीसी होणार आहे. या एमआयडीसीत व्ही-तारा कंपनी फॅक्टरी सुरु करणार असून पाच हजार कोटींची गुंतवणूक होणार आहे. यामुळे स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. येणाऱ्या काळात जिल्ह्यातील हजारो बेरोजगार तरुणतरुणी विविध नामांकित कंपन्यांमध्ये काम करतांना दिसतील. दळणवळणाच्या सुविधेसाठी नेर ते यवतमाळपर्यंत सिमेंट रस्त्याच्या कामाला मंजुरी मिळाली असल्याची माहिती देखील पालकमंत्री संजय राठोड यांनी यावेळी बोलतांना दिली.
तरुणांसाठी स्पर्धा परीक्षेची पुस्तके गावातच
राज्य शासनाच्या विविध विभागाच्या भरती प्रक्रिया सुरु आहेत. नोकरीच्या शोधात असलेल्या ग्रामीण भागातील तरुण-तरुणींना स्पर्धा परीक्षांची पुस्तके देण्याचा निर्णय पालकमंत्री संजय राठोड यांनी घेतला असल्याचे सांगितले. ही पुस्तके ग्रामपंचायत कार्यालय, जिल्हा परिषद शाळांमध्ये उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. यासाठी विशेष बाब म्हणून जिल्हा परिषदेला अनुदान उपलब्ध करुन दिले आहे. लवकरच निविदा निघतील. यामुळे तरुणांना गावातच स्पर्धा परिक्षेची तयारी करता येणार आहे. त्यांना क्लासेससाठी शहराच्या ठिकाणी जाण्याची गरज पडणार नाही. यातून विद्यार्थी आणि पालकांचा खर्च वाचेल, असेही पालकमंत्री श्री. राठोड यावेळी म्हणाले.
सामाजिक बांधिलकीतून अविरत समाजसेवा
जिल्ह्यातील गोरगरिब, गरजू आणि अडल्यानडल्यांना गेल्या अनेक वर्षांपासून मदत करत आहोत. ग्रामीण भागात रस्ते, विज, नाल्या नळपाणी पुरवठा अशा मूलभूत सुविधा या शासकीय कामांसह समाज भवन, आरोग्य शिबीर, रक्तदान, नेत्र तपासणी आणि शस्त्रक्रिया, रुग्णांना वैद्यकीय सहाय्य आदी समाजसेवेची कामे सामाजिक बांधिलकीतून अविरतपणे केली आहेत. त्याची पोच नागरिकांच्या प्रतिसादातून मिळत आहेत. आगामी काळातही विकासाची कामे करणार असल्याचे पालकमंत्री श्री राठोड यांनी सांगितले.
यावेळी पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा पारितोषिक देवून सत्कार करण्यात आला.