गोंदिया : पंचायत समिती अंतर्गत लोधीटोला येथे मनरेगा तसेच आवास योजनेचे कार्य प्रगती पथावर आहेत. त्यातच मस्टर पूर्ण करण्यासाठी पैश्याची मागणी होत असल्याची बाब सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर आली. एकंदरीत हा सरपंचाला बदनाम करण्याचा डाव असल्याचे समजून आल्याने १३ ऑक्टोबरला लोधीटोलाचे सरपंच संजय ठाकरे यांनी थेट पंचायत समिती येथे येवून कर्मचार्यांना चांगलेच खडेबोल सुनावले. दरम्यान प्रकरणी पं.स.सभापती मुनेश रहागडाले यांनी समजुत काढली.
स्थानिक स्वराज्य संस्थे अंतर्गत जिल्हा परिषदेच्या अनेक योजनांची अंमलबजावणी पंचायत समितीमार्फत होत असते. मनरेगासह आवास योजना व इतर योजनांचाही यात समावेश आहे. पंचायत समितीमध्ये कंत्राटी तत्वावर कार्यरत असलेल्या अभियंता व कर्मचार्यांकडून गावातील रोजगारसेवक तसेच सरपंचाशी साठगाठ करून गैरप्रकार करीत असल्याचेही अनेक वेळा समोर आले. अशातच लोधीटोला येथे मस्टर तयार करण्यासाठी पंचायत समितीमध्ये कार्यरत एका कंत्राटी अभियंत्याने पैश्याची मागणी केली. यासाठी गावातील रोजगार सेवकाने लाभार्थ्यांकडून ५०० रुपये घेण्याचे सांगितले. ही बाब गावात सोशल मीडियाच्या माध्यमातून चांगलीच पसरली. एकंदरीत या प्रकाराला सरपंचाचा पाठबळ असल्याचेही टिका होऊ लागल्याने १३ ऑक्टोबरला सरंपच संजय ठाकरे यांनी थेट पंचायत समिती गाठत त्या कर्मचार्यांची चांगली कानउधळणी केली. दरम्यान हा प्रकार पंचायत समिती सभापतीच्या लक्षात आल्यानंतर त्या कर्मचार्यांना कक्षात बोलावून चांगलीच समज दिली. या वरून पंचायत समितीतील गैरप्रकार चव्हाट्यावर आला आहे.