विद्यार्थ्यांचे जाती दावा पडताळणी संदर्भात त्रुटी पुर्तता शिबिराचे आयोजन

0
5

 गोंदिया, दि.16 : 2023-24 या शैक्षणिक सत्रात 12 वी विज्ञान शाखेचे अनुसूचित जाती, विमुक्त जाती-भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना भविष्यात व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश घेण्यापुर्वी त्यांचे जात प्रमाणपत्राची पडताळणी करुन जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त करुन घेणे आवश्यक असल्याने त्यांचे प्रस्ताव संबंधित कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य यांचेमार्फत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, सामाजिक न्याय भवन, जिल्हाधिकारी कार्यालयाचे मागे, गोंदिया येथे प्राप्त होत आहेत. तथापी, सदर प्रस्ताव सादर करतांना विद्यार्थी-अर्जदाराचे कुटूंबियाचे अनुसूचित जातीकरीता 10 ऑगस्ट 1950, विमुक्त जाती-भटक्या जमातीकरीता 21 नोव्हेंबर 1961, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गाकरीता 13 ऑक्टोबर 1967 पुर्वी व त्या तारखेस गोंदिया जिल्ह्यातील सर्वसाधारण अधिवास असल्याबाबत अधिवास पुरावा व जातीच्या नोंदीचे सबळ पुरावे सादर करणे आवश्यक आहे.

         तथापी, बऱ्याच प्रस्तावामध्ये वरील नमूद प्रवर्ग निहाय मानीव दिनांकास अधिवासाचा पुरावा संलग्न केला नसल्याचे आढळते. तसेच काही प्रकरणात सहसंबंध पुरावे संलग्न नसल्याचे आढळते. अशा त्रुटीच्या प्रकरणात संबंधीत अर्जदारास त्यांचे प्रस्तावातील त्रुट्या त्यांचे ई-मेल आयडीवर, भ्रमणध्वनीवर तसेच पत्राद्वारे कळविण्यात आलेले आहे व येत आहे. या संदर्भात त्रुटी पुर्तता शिबिराचे आयोजन 16 ते 31 ऑक्टोबर 2023 दरम्यान समिती कार्यालयात करण्यात आले आहे. करीता त्रुटी कळविण्यात आलेल्या अर्जदारांनी अथवा त्यांचे पालकांनी त्रुटी पुर्तते संदर्भात आवश्यक दाखला/पुरावा प्राप्त करुन त्याची मूळ व झेरॉक्स प्रतिसह सदर कालावधी दरम्यान समिती कार्यालयात उपस्थित राहून त्रुटी पुर्तता करुन शिबिराचा लाभ घ्यावा.

        तसेच इयत्ता 12 वी शाखेच्या ज्या मागासवर्गीय (अनु.जाती, विजाभज, इमाव व विमाप्र) विद्यार्थ्यांनी त्यांचे जाती दावा पडताळणीचे प्रस्ताव ऑनलाईन अर्ज, संबंधीत पुरावे, शपथपत्र व नमूना 15A मध्ये प्राचार्यांचे शिफारस पत्रासह समिती कार्यालयात अद्याप सादर केलेले नाहीत, त्यांनी त्यांचे प्रस्ताव संबंधीत कनिष्ठ महाविद्यालयात जमा करावे व त्या महाविद्यालयातील समान संधी केंद्राचे नोडल अधिकारी (प्राध्यापक किंवा लिपीक) यांनी एकत्रितपणे अशा विद्यार्थ्यांचे प्रस्ताव समिती कार्यालयात जमा करावे. सद्यस्थितीत इयत्ता 11 वी विज्ञान शाखेच्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे जाती दावा पडताळणीचे प्रस्ताव पुढील सूचनेपर्यंत सादर करु नये. तसेच कुटूंबातील सख्खे नातेवाईकांशिवाय अन्य त्रयस्थ व्यक्तीमार्फत प्रस्ताव व त्रुटी पुर्तता सादर करण्यात येऊ नये. असे उपायुक्त तथा जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे सदस्य राजेश पांडे यांनी कळविले आहे.