नागपूर,दि. 16 ऑक्टोबर 2023:- ग्राहक सुविधांचा लाभ घेण्यासाठी महावितरणच्या नागपूर प्रादेशिक कार्यालयांतर्गत असलेल्या विदर्भातील अकराही जिल्ह्यातील तब्बल 57 लाख 9 हजार 357 वीजग्राहकांनी स्वतःच्या मोबाईल क्रमांकाची महावितरणकडे नोंदणी केली असून एकूण वीज ग्राहकांच्या तुलनेत ही टक्केवारी 91.13 टक्के आहे. यात नागपूर परिमंडलातील सर्वाधिक 17 लाख 49 हजार 415 ग्राहकांनी आपल्या मोबाईल क्रमांकाची नोंद केली आहे.

नागपूर पाठोपाठ अमरावती परिमंडलातील 12 लाख 84 हजार 890, अकोला परिमंडलातील 12 लाख 65 हजार 66, चंद्रपूर परिमंडलातील 7 लाख 52 हजार 403 तर गोंदीया परिमंडलातील 6 लाख 57 हजार 583 ग्राहकांनी त्यांच्या मोबाईल क्रमांकाची नोंदणी महावितरणकडे केली आहे. टक्केवारीनुसार विचार करता गोंदीया परिमंडलातील सर्वाधिक 93.42 टक्के ग्राहकांनी त्याखालोखाल अकोला परिमंडलातील 92.46 टक्के ग्राहकांनी, नागपूर परिमंडलातील 91.13 टक्के ग्राहकांनी, अमरावती परिमंडलातील 90.46 तर चंद्रपूर परिमंडलातील 88.86 ग्राहकांनी  त्यांच्या मोबाईल क्रमांकाची नोंद महावितरणकडे केली आहे.

महावितरणकडे मोबाईल क्रमांकाची नोंदणी करणा वीज ग्राहकांना मीटर रिडिंग, वीजबिलाचा तपशील, वीज बंद असण्याचा कालावधी यासह विविध माहिती ‘एसएमएस’द्वारे पाठवण्यात येते. ग्राहकांना मीटर रीडिंग घेतल्यानंतर काही तासांच्या आत रीडिंग घेतल्याची तारीख, वेळ, सध्याचे एकूण युनिट व वापरलेले विजेचे युनिट याचा तपशील असणारा ‘एसएमएस’ महावितरणकडून पाठवण्यात येतो. यात विसंगती आढळल्यास तातडीने तक्रार करून बिलासंदर्भात निर्माण होणारे नंतरचे वाद टाळता येतात. तर वीजबिल तयार झाल्यानंतर बिलाची रक्कम व बिल भरण्याची अंतिम मुदत याची माहिती असणारा ‘एसएमएस’ ग्राहकांना पाठवला जातो. याशिवाय नियोजित देखभाल व दुरुस्तीसाठी बंद ठेवण्यात येणारा वीजपुरवठा व पुरवठा खंडित राहण्याचा कालावधी याची पूर्वसूचना ‘एसएमएस’मार्फत दिली जाते. तांत्रिक किंवा इतर कारणामुळे वीजपुरवठा बंद झाल्यास त्याची माहिती व वीजपुरवठा पूर्ववत होण्यासाठी लागणारा कालावधीची माहिती या सुविधेत मिळते.

ग्राहकाभिमुख सेवांसाठी महावितरणने अद्ययावत तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध करून दिलेल्या सेवांचा वापर ग्राहकांनी अधिकाधिक प्रमाणात करावा यासाठी महावितरन सतत्याने पाठपुरावा करीत आहे.  महावितरणकडून वीजग्राहकांना मोबाईल क्रमांक किंवा इमेलची नोंदणी करण्यासाठी विविध पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यात महावितरणच्या 9225592255 या क्रमांकावर एसएमएसद्वारे वीजग्राहकांना स्वतःच्या मोबाईल क्रमांकाची नोंदणी करण्याची सोय आहे. वीजग्राहकांनी नोंदणी करावयाच्या मोबाईल क्रमांकावरून 9225592255 क्रमांकावर MERG (बारा अंकी ग्राहक क्रमांक) अशी माहिती टाईप करून एसएमएस केल्यास मोबाईल क्रमांकाची नोंदणी करता येते. याच पर्यायांचा वापर करीत ग्राहकांना आपल्या बदललेल्या मोबाईल क्रमांकाची नोंदणी देखील करता येते.

याशिवाय महावितरण कॉल सेंटरच्या 18002123435 आणि 18002333435 या टोल फ्री या क्रमांकावर देखील ग्राहकाला त्याच्या मोबईल क्रमांकाची नोंदणि करण्याची सुविधा उपलब्ध आहे. कॉल सेंटर व्यतिरिक्त महावितरणच्या www.mahadiscom.in या संकेतस्थळावरून किंवा महावितरण मोबाईल अ‍ॅपवर देखील मोबाईल क्रमांक नोंद करण्याची सुविधा उपलब्ध असल्याने ग्राहकांनी या सेवेचा लाभ मोठ्या प्रमाणात घेण्याचे आवाहन महावितरणतर्फ़े करण्यात आले आहे.