अडीच कोटीच्या रस्त्यावर मुरमाचे पांघरून

0
25

इर्रि-नवरगाव रस्त्यावरील प्रकार
नागरिकांनी व्यक्त केला संताप

देवेंद्र रामटेके
गोंदिया(ता.19) मागच्या अनेक वर्षापासून गोंदिया तालुक्यांतील इर्रि-नवरगाव खुर्द रस्ता अत्यंत खराब झाला होता.यावरून नागरिकांना चालणे हि दुरापस्त झाले होते. परिसरातील नागरिकांनी वेळोवेळी केलेल्या मागणी मुळे अखेर बांधकाम विभागाने सदर रस्ता दुरुस्तीचे काम हाती घेतले. त्यासाठी अडीच कोटी रुपयांची तरतूदही करण्यात आली. सदर रस्ता दुरुस्तीला मोठा गाजावाजा करून सुरुवातही करण्यात आली. परंतु सदर रस्त्यावरील खड्डे बुजवितानी त्यात मुरमाचा वापर करण्यात येत असल्याने काही दिवसातच सदर रस्ता आपल्या “जैसे थे”च्या स्थितीत होणार नाही ना? अशी शंका घेत परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
मागच्या अनेक वर्षापासून सदर रस्ता मोठया प्रमाणात उखडलेला होता. त्यात मोठमोठी खड्डे देखील पडले होते.त्यामुळे सदर रस्त्यावरून नागरिकांना जीव मुठीत धरून चालावे लागत असे. सदर रस्ता खराब असल्यामुळे यावर मोठ्या प्रमाणात अपघात घडून आले. माध्यमांनीही सदर रस्त्याचा प्रश्न अनेकदा उचलून धरला. अखेर आमदार विनोद अग्रवाल यांच्या प्रयत्नाने सदर साडेतीन किलोमीटर रस्ता दुरुस्तीसाठी जवळपास अडीच कोटी रुपये निधी मंजूर करून सदर रस्ता दुरुस्तीचा मार्ग मोकळा करण्यात आला. तसेच या रस्त्याचे कंत्राट हि शहरातील एका बड्या कंत्राटदाराला देण्यात आले असल्याचे बोलले जात आहे. सदर रस्ता दुरुस्तीचे काम योग्य प्रकारे होत आहे की नाही याचे निरीक्षणही आमदार महोदयांनी दोन दिवसापूर्वीच केले असल्याचे बोलले जात आहे. असे असले तरी सदर रस्त्यांवरील गड्डे बुजविण्यासाठी केवळ मुरमाचा व मातीचा उपयोग करण्यात येतं असल्याने परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. कंत्राटदाराकडून सदर रस्ता दुरुस्तीच्या नावावर केवळ पॉलिश लावण्याचे काम तर होत नाही ना?अशी शंका परिसरातील नागरिक घेत आहेत. आमदार महोदयांनी मोठया परिश्रमाने खेचून आणलेल्या विकास कामांना सदर बांधकाम कंत्रादार मजबुती प्रदान करतो की पुन्हा “जैसे थे” ची स्थिती आणतो हे येणारा काळच ठरवेल.