सज्जनशक्तीने एकत्रितपणे राष्ट्रविरोधी शक्तींशी लढा द्यावा : दुर्गादास व्यास

0
8

– संघाचा विजयादशमी व शस्त्रपूजन उत्सव

गोंदिया : हिंदू संस्कृतीमधील कुठल्याही धर्मग्रंथात जातीभेदाबाबत लिहले नाही. महापुरुष व धर्माचार्यांनी सर्वांना समरसतेचा विचार दिला. मात्र, हिंदू समाजाला विभक्त करण्यासाठी जातीभेद निर्माण करण्यात आला. याचा लाभ राष्ट्रविरोधी शक्तींद्वारे समाजाला तोडण्यासाठी धर्मांतराच्या माध्यमातुन करण्यात आला. आता तर लवजिहाद, लँडजिहाद, अर्बन नक्षलवाद आदींच्या माध्यमातून राष्ट्र व हिंदू समाजाला विभक्त करण्याचा प्रयत्न होत आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाद्वारे हिंदू, राष्ट्रभक्ती व भारताच्या आध्यात्म शक्तीचे जागरण निरंतर सुरु आहे. जस जसे हिंदूत्वाचे जागरण होत आहे, तसे राष्ट्रविरोधी शक्ती एकत्रित होऊन समोर येत आहेत. आता हा सरळ संघर्ष असून या शक्तींचा आपल्याला सामना करावा लागणार आहे. यासाठी सज्जनशक्तीने एकत्रितपणे राष्ट्रविरोधी शक्तींशी लढा द्यावा, असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य तथा भटक्या जमाती कार्यप्रमुख दुर्गादास व्यास यांनी केले.
येथील गुरुनानक विद्यालयाच्या प्रांगणात 28 ऑक्टोबर रोजी आयोजित राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गोंदिया नगराचा विजयादशमी व शस्त्रपूजन कार्यक्रमात प्रमुक्त वक्ता म्हणून ते बोलत होते. मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून लायन्स क्लब गोंदिया रॉयलच्या सचिव निशी हरलीन होरा, विभाग सहसंघचालक दलजीतसिंह खालसा, जिल्हा संघचालक लिलाराम बोपचे, नगर संघचालक मिलिंद अलोणी उपस्थित होते. पुढे बोलताना व्यास म्हणाले, 98 वर्षांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली. 84 टक्के समाजाला संघटित करण्याचे कार्य संघाने केले आहे. हिंदू समाज शक्तीशाली झाला तरच देश मजबूत होईल, या उद्देशाला घेऊन संघ कार्य करीत आहे. दोन वर्षानंतर संघाची शताब्दी वर्ष पूर्ण होणार असून, यानिमित्त दोन प्रमुख उद्देश ठेवले आहे, संघकार्याचा विस्तार आणि समाज व देशाला शक्तीशाली बनविणे. आजघडीला देशात 60 हजार शाखेच्या माध्यमातून 40 पेक्षा जास्त संघटन व लाखो स्वयंसेवकाद्वारे 1 लाखापेक्षा अधिक सेवाकार्य सुरु आहे. जगातील 40 देशांमध्ये संघाचे कार्य सुरु आहे. समाजात ‘गर्व से कहो हम हिंदू है’ हा विचार जनमानसात पोहोचविण्याचे कार्य संघ निरंतर करीत आहे.
1 हजार वर्षानंतर राष्ट्रभक्ती असलेले लोकं शासनात आले असून प्रत्येक व्यक्तीला राष्ट्रशक्तीशाली करण्यासाठी संकल्प घेऊन कार्य करणे गरजेचे आहे. यात समाजातील विषमता दूर करण्यासाठी समरसतेच्या भावनेचे पोषण करणे, स्वदेशी मानसिकता निर्माण करुन स्थानिक उत्पादनाचा वापर करणे, पर्यावरण, जल व उर्जा संवर्घन करुन नागरिक अनुशाषन पालनाचे संकल्प करावा, असे आवाहन व्यास यांनी यावेळी केले.
प्रमुख पाहुणे निशी होरा आपले मनोगत व्यक्त करीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ समाजात करीत असलेले सेवा कार्य प्रेरणादायी असल्याचे सांगितले. प्रारंभी पूर्ण गणवेशातील स्वयंसेवकांनी शहरातील प्रमुख मार्गाने पथसंचलन केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला अतिथींच्या हस्ते शस्त्रपूजन करण्यात आले. दरम्यान, स्वयंसेवकांनी योग, दंड, कवायत आदी प्रात्याक्षिक सादर केले.