राजस्थान महाविद्यालयात विद्यार्थ्यांना विधी सेवा सप्ताहानिमित्त मार्गदर्शन

0
7

वाशिम, दि. 07   जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, ॲड. रामकृष्णजी राठी विधी महाविद्यालय, राजस्थान महाविद्यालय, महिला सेल विभाग व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त वतीने 6 नोव्हेंबर रोजी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश राजीव पांडे यांच्या अध्यक्षतेखाली राजस्थान महाविद्यालयात विधी सेवा सप्ताहाअंतर्गत कायदेशीर मार्गदर्शन व बालकांचे लैंगिक शोषणापासून संरक्षण अधिनियम यावर साहित्य कला मंडळ कळसुत्री निर्मित अभया नाटीकेचे आयोजन करण्यात आले. यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणे सचिव व्ही. ए. टेकवाणी, रामकृष्णजी राठी विधी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रकाश दाभाडे, राजस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य ओमप्रकाश झंवर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

            यावेळी न्या. श्री. पांडे यांनी अभया नाटीकेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना बालकांचे लैंगिक शोषणापासून संरक्षण अधिनियम या कायदयाची सविस्तर माहिती देण्यात येणार असल्याचे सांगितले.

            बालकांचे लैंगिक शोषणापासून संरक्षण अधिनियम या कायदयाबाबत उपस्थित विद्यार्थ्यांमध्ये कायदेविषयक जनजागृती व्हावी, या अनुषंगाने साहित्य कला मंडळ कळसुत्रीनिर्मित मीना नाईक यांनी लेखन व दिग्दर्शन केलेल्या अभया नाटिकेचे स्नेहा धडवाई व निलेश बोडले यांनी उत्कृष्ठपणे सादरीकरण केले.

            कार्यक्रमाला राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. शैलेश सोनोने, महिला सेल प्रमुख डॉ. ज्योस्ना पाटील, सर्व लोक अभिरक्षक, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे कर्मचारी, राजस्थान महाविद्यालयाचे प्राध्यापक, शिक्षकवृंद, कर्मचारी व विद्यार्थ्यांची बहुसंख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन व उपस्थितांचे आभार मुख्य लोक अभिरक्षक परमेश्वर शेळके यांनी मानले.