VIDEO: शेतकऱ्यांना अल्प नुकसान भरपाई मिळाल्याने विमा कंपनीच्या अधिकाऱ्याला काळे फासले

0
11

यवतमाळ: शासनाने घोषित केलेल्या पीक विमा मदतीत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चक्क दोन, पाच, दहा रुपयांची मदत देऊन विमा कंपन्या शेतकऱ्यांची थट्टा करत आहे. असंख्य शेतकऱ्यांना अत्यल्प विमा परतावा मिळाल्याने शिवसेना ठाकरे गट चांगलाच संतप्त झाला. पीक विमा कंपनीच्या व्यवस्थापकासह जिल्हा कृषी अधीक्षक यांना यवतमाळ तालुक्यातील कारेगाव यावली शेतशिवारात पाहणीसाठी नेले. तेथे विमा कंपनीच्या धोरणांचा निषेध करीत संतप्त शिवसैनिकांनी रिलायन्स विमा कंपनीच्या अधिकाऱ्यास मारहाण केली. या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना आज, मंगळवारी दुपारी घडली.

यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना १० रुपयापेक्षाही कमी पीक विमा नुकसानभरपाई मिळाली आहे. जिल्ह्यातील ७८ शेतकऱ्यांना विमा कंपनीने पाच रुपयांपेक्षा कमी मदत दिल्याचा प्रकार समाेर आला. दिवाळीपूर्वी विमा कंपनीने ५९ हजार शेतकऱ्यांना ४१ कोटींची मदत जाहीर केली. या मदत यादीतील नऊ हजार ७२७ शेतकऱ्यांना एक हजार रुपयेसुद्धा मदत मिळाली नाही. अनेक शेतकऱ्यांना दोन, पाच, दहा रुपये, अशी नुकसानभरपाई मिळाली आहे. काही शेतकऱ्यांच्या खात्यात २००, ५००, एक हजार रुपयांची मदत जमा झाल्याचा प्रकार जाहीर केलेल्या यादीतून समोर आला आहे.विमा कंपनीने शेतकऱ्यांची थट्टा लावल्याने शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला. विमा कंपनीच्या व्यवस्थापकास व कृषी अधीक्षकांना शेतीच्या बांधावर नेत, पिकांची स्थिती दाखवून प्रश्नांची सरबत्ती केली. विमा प्रतिनिधी समाधानकारक उत्तर देऊ शकला नाही. त्यामुळे संतप्त शिवसैनिकांनी विमा कंपनीच्या व्यवस्थापकास बेदम मारहाण केली. या घटनेचा व्हीडिओ समाज माध्यमात व्हायरल झाला आहे. प्रकारानंतर जिल्हा कृषी अधीक्षक यांनी विमा कंपनीच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना या पद्धतीने मारहाण करू नये, असे आवाहन केले. या मारहाणप्रकरणी विमा कंपनीने पोलिसात तक्रार दिली आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे किशोर इंगळे आणि संजय रंगे यांनी जिल्ह्यात पीक विमा वाटपात घोळ झाल्याचा आरोप केला. जिल्ह्यातील सात लाख ८५ हजार नुकसानग्रस्त शेतकरी विम्यापासून वंचित असल्याचे सांगितले. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शासन आणि पालकमंत्री संजय राठोड यांनी वाऱ्यावर सोडल्याचा आरोपही शिवसेना ठाकरे गटाने केला आहे.