गोंदिया:- मूलभूत हक्क म्हणून मोफत शिक्षणाची सोय आमच्या भारतीय राज्यघटनेत करून देण्यात आलेली आहे. पण शिक्षणाच्या खाजगीकरणामुळे 15 हजार शासकीय शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहेत. 01 जानेवारी 1848 ला मुलींची पहिली शाळा ज्योतीबा-सावित्री ने स्थापित करून क्रांतिकारी सुरुवात केली. हा महामानवांचा वारसा कायम ठेवणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. नवीन शैक्षणिक धोरणामुळे सर्वसामान्य नागरिकांना कठीण होत असलेले शिक्षण व बंद होत असलेल्या शासकीय शाळा वाचविण्यासाठी प्रयत्न होणे काळाची गरज आहे. क्रांती.सावित्रीमाई फुले यांच्या जयंती दिनी शिक्षण वाचविण्यासाठी संकल्प करणे, ठोस पाऊल उचलणे तसेच वर्षभर प्रयत्न उपाययोजना करणे आवश्यक आहे. सत्य ओळखून असाच एक दृढ़ संकल्प- प्रयत्न- संयुक्त संघटीत पणे
शिक्षण वाचवा मोहीम- संविधान जागृती अभियान अंतर्गत क्रांती. सावित्रीमाई फुले, मुक्ता साळवे, फातिमा शेख व राजमाता जिजाऊ जयंती तसेच मुलींची प्रथम शाळा स्थापना दिना निमित्ताने संविधान मैत्री संघ, सावित्रीमाई फुले विचार मंच गुदमा शिक्षण बचाव समन्वय समिति- पुरोगामी प्रबोधन चळवळ यांच्या संयुक्त माध्यमातून “जिल्हास्तरीय शिक्षण वाचवा परिषद” दि. 03 जानेवारी 2024 बुधवारला, ग्रामपंचायत पटांगण परिसर गुदमा ता. जि.गोंदिया येथे करण्यात येत आहे. संविधान जागृती अभियान समन्वयक प्रा. डॉ. दिशा गेडाम यांच्या अध्यक्षतेखाली होत असलेल्या या शिक्षण वाचवा परिषदेत मार्गदर्शक म्हणून शिक्षण बचाव समन्वय समितीचे अध्यक्ष रमेश बिजेकर, ओबीसी महिला महासंघाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुषमा भड, पुरोगामी प्रबोधन चळवळीचे रवि हाडे, विचारवंत शब्बीर पठाण, ज्येष्ठ नागरिक साहित्यिक वसंत गवळी, सी.पी. बिसेन, वन स्टॉप क्रायसिस सेंटर समुपदेशक समिना खान, संविधान मैत्री संघाच्या पौर्णिमा नागदेवे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.
सर्व नागरिकांच्या साक्षीने हा संकल्प कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तसेच वर्षभर शिक्षण वाचवा- शाळा वाचवा मोहीम राबवून गावागावात जनजागृती सहकार्य करण्याचे आवाहन क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले विचार मंच गुदमा व संविधान मैत्री संघातर्फे करण्यात आले आहे.