गोंदिया : मागील वर्षभरापासून गोंदियात सकाळी पोहोचणाऱ्या विदर्भ एक्स्प्रेसचे व सायंकाळी पोहोचणाऱ्या महाराष्ट्र एक्स्प्रेसचे वेळापत्रक पूर्णपणे ढासळले आहे. नवीन वर्षांत तरी ते सुरळीत होईल, अशी अपेक्षा प्रवाशांना होती; पण गेले दोन दिवस नवीन वर्षातही या रेल्वेगाड्यांचा उशिरा येण्याचा रेकॉर्ड कायम आहे. या रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक रुळांवर येत नसल्याने प्रवासी त्रस्त; तर रेल्वे विभाग यावर तोडगा काढण्याऐवजी सुस्त असल्याचे चित्र आहे.महाराष्ट्र एक्स्प्रेसची गोंदिया रेल्वेस्थानकावर पोहोचण्याची वेळ सायंकाळी ६:३० वाजताची असून ती गाडी थेट रात्री १० ते १०:३० ला, तर सकाळी ११:१५ ची विदर्भ दुपारी एक वाजता गोंदिया स्थानकावर पोहोचत असल्याने प्रवाशांची डोकेदुखी वाढली आहे. मागील तीन चार दिवसांपासून या समस्येत अधिक वाढ झाली आहे. दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेचे गोंदिया रेल्वेस्थानक हे मध्यवर्ती ठिकाण आहे. या रेल्वेस्थानकावर दररोज हजारो प्रवासी रेल्वेने ये-जा करतात. काही मासिक पास काढून, तर काहीजण रेल्वेचा प्रवास सोयीचा आणि तिकिटाला परवडणारा असल्यामुळे खासगी वाहनांसह एस.टी. बसेसना फाटा देऊन रेल्वेने प्रवास करीत आहेत. मात्र बिघडलेल्या या रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक अजूनही रुळांवर आलेले नाही.
नागपूरच नव्हे, तर रायपूरकडून गोंदियाच्या दिशेने येणाऱ्या सर्वच गाड्या तासानतास उशिरा धावत आहेत. रेल्वे प्रशासनाला प्रवासी रेल्वेच्या वेळेचे भानच राहिलेले नाही. एक्स्प्रेस, लोकल पॅसेंजर असोत, गंगाझरीनंतर दीड ते दोन तास थांबवून ठेवल्या जात आहेत. ढाकणी, रामनगर, सूर्याटोलाजवळ रुळा वर या गाड्या हमखास थांबत आहेत. गोंदिया स्थानकावर पोहोचण्यासाठी लागणाऱ्या १० ते १५ मिनिटांच्या अंतराला तब्बल दीड ते दोन तास लागत आहेत. कधी एकाच ट्रॅकवर या गाड्यांसमोर एक ते दोन मालगाड्या थांबवून ठेवल्या जात आहेत.
विद्यार्थी, व्यावसायिक, नोकरदार आणि सर्वसामान्यांना फटका
रेल्वे गाड्यांच्या उशिरा धावण्या विषयी अनेकदा निवेदन देण्यात आले. प्रवाशांनी हल्ला- बोल देखील केला; परंतु, रेल्वे प्रशासनावर त्याचा कोणताही परिणाम होत नाही. त्यामुळे गाड्या दररोज विलंबाने चालत आहेत. त्याचा फटका मात्र विद्यार्थी, व्यावसायिक, नोकरदार आणि सर्वसामान्य प्रवाशांनादेखील बसत आहे.
प्रवासी आंदोलन छेडणार
हावडा-मुंबई मार्गावरील रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक अद्यापही सुधारले नाही. तर आऊटवर गाड्या तास दीड तास थांबवून ठेवल्या जातात. यात सुधारणा करण्याची विनंती रेल्वे विभागाला प्रवाशांनी केली. पण यात अद्यापही सुधारणा केली नाही. परिणामी प्रवाशांची समस्या कायम आहे. त्यामुळे आता या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा प्रवासी संघटनांनी दिला आहे.