छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित ‘जाणता राजा’ महानाट्य कार्यक्रमाचे आयोजन

0
6

इंदिरा गांधी स्टेडियम गोंदिया येथे होणार महानाट्य कार्यक्रम

21 ते 23 जानेवारी दरम्यान कार्यक्रमाचे आयोजन

‘जाणता राजा’ महानाट्य सर्वांसाठी नि:शुल्क राहणार

जिल्ह्यातील नागरिकांना लाभ घेण्याचे जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांचे आवाहन

      गोंदिया, दि.16 : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350 व्या राज्याभिषेक वर्षानिमीत्त पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाद्वारे इंदिरा गांधी स्टेडियम, गोंदिया येथे दिनांक 21 जानेवारी ते 23 जानेवारी 2024 या कालावधीत ‘जाणता राजा’ महानाट्याचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची, नितीची, चरित्राची, विचारांची व कार्यकुशलतेची महती सर्वसामान्यांना विशेष करुन तरुग्ण पिढीला मार्गदर्शक ठरावी, तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गौरवशाली व अलौलिक वारशाची जोपासणा करण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. तरी जिल्ह्यातील नागरिकांनी ‘जाणता राजा’ महानाट्य कार्यक्रमाचा भरपूर आनंद घ्यावा, अशी माहिती जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. निवासी उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपत्रे यांची यावेळी प्रामुख्याने उपस्थिती होती.

         जिल्हाधिकारी श्री. गोतमारे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार ‘जाणता राजा’ या महानाट्याच्या माध्यमातून राज्यातील प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचविण्याचा शासनाचा मानस आहे. त्यांच्या प्रेरणादायी विचारांचा वारसा नव्या पिढीपर्यंत जावे यासाठी शासनाने यासाठी पुढाकार घेतल्याचे त्यांनी सांगितले. शिवशाहीर महाराष्ट्र भूषण बाबासाहेब पुरंदरे यांनी जाणता राजाची सुरुवात केली होती, याचे देशभर शेकडो प्रयोग झाले. मात्र हे नाटक आपल्याला बघावेसे वाटते इतके प्रेरणादायी आहे. स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजे होते, त्यांचा इतिहास आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे असे सांगून ते पुढे म्हणाले, गोंदिया येथे होणाऱ्या ‘जाणता राजा’ महानाट्य कार्यक्रमाप्रसंगी जिल्ह्यातील नागरिकांची पार्कींगसाठी गैरसोय होणार नाही यासाठी 21 ते 23 जानेवारी दरम्यान सुषाभ स्कुल न.प. गोंदिया व पार्कींग प्लाझा न.प. गोंदिया या ठिकाणी पार्कींची व्यवस्था करण्यात येणार आहे. ‘जाणता राजा’ या महानाट्य कार्यक्रमातून शिवाजी महाराजांचे भव्य दिव्य असे दर्शन होणार आहे. सदर कार्यक्रम सर्वांसाठी पुर्णपणे नि:शुल्क आहे. जवळपास 110 ते 120 कलाकारांचा यात समावेश असणार असून 5 घोडे व 2 उंटाचा यात समावेश असणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन कार्याची महती जिल्ह्यातील नागरिकांना व्हावी हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

        राज्यातील विविध प्रांतातील संस्कृतीचे आदान-प्रदान, स्थानिक कलाकारांसाठी व्यासपीठ, लुप्त होत चाललेल्या कला व संस्कृतीचे जतन व संवर्धन, तसेच स्वातंत्र्य लढ्यातील ज्ञात अज्ञात लढवयांची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी जिल्ह्यात फेब्रुवारी-2024 मध्ये ‘महासंस्कृती महोत्सवाचे’ आयोजन पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांनी सांगितले.