अर्जुनी मोर. तालुक्यात रामनामाचा एकच गजर

0
8

अर्जुनी मोर.- अयोध्येत २२ जानेवारी रोजी भगवान श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्य अर्जुनी मोर. तालुक्यातील संपूर्ण गावांत रामनामाचा एकच जल्लोष करण्यात आला.यानिमित्ताने संपुर्ण तालुका राममय झाला.तालुक्यात आज सकाळपासुनच गावागावातील विविध मंदिरांमधे धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. शोभायात्रा, रॅली,महाआरती, भजनपुजन ,महाप्रसाद व गावभोजनाचे आयोजन करण्यात आले. एकंदरीत संपुर्ण तालुका राममय झाला.
अर्जुनी मोर तालुक्यात अर्जुनी मोर. शहर,नवेगावबांध, महागाव,केशोरी, बोंडगाव देवी, या मोठ्या गावांसोबत प्रत्येक खेड्यापाड्यात रामलल्लाचा एकच जल्लोष पहायला मिळाला. पाचसे वर्षाचा संघर्ष आणि दीर्घ प्रतिक्षेनंतर अयोध्येत 22 जानेवारीला रामलल्ला विराजमान झाले. हा महाउत्सव देशभर साजरा करण्यात आला. याच पार्श्वभूमीवर अर्जुनी मोरगाव शहरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. श्रीराम प्राणप्रतिष्ठा उत्सव समिती अर्जुनी मोरगाव च्या वतीने सकाळी नऊ वाजता भव्य शोभा यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. ही शोभायात्रा दुर्गा चौक येथून प्रारंभ होऊन शहरातील प्रमुख मार्गाने निघून राम मंदिरामध्ये नेण्यात आली. शोभायात्रेचे ठिकठिकाणी रामभक्ताकडून स्वागत औक्षण करण्यात आले. शहरातील विविध मंदिरात आतीशबाजी, रोषणाई करण्यात आली. विविध सामाजिक संस्थांकडून मार्गात शरबत पाणी लड्डू मिठाई वाटप करण्यात आले .संपूर्ण मार्गातील मंदिरांमध्ये आरती सुद्धा करण्यात आली. राम नामाच्या गजरात अर्जुनी नगर वासी तल्लीन झाले होते. शोभायात्रेत हजारो महिला पुरुष अबाल वृद्ध सहभागी झाले होते सायंकाळी नगर भोजन आणि महाप्रसाद वितरण करण्यात आले. नगरातील मंदिरात रोषणाई घरोघरी रांगोळी पताका घरावर रामध्वज यामुळे संपूर्ण अर्जुनी मोरगाव शहर भगवामय झाला होता.