पंचायत समिती नवीन इमारतीचे २५ जानेवारीला लोकार्पण ?

0
24

= कर्मचाऱ्यांमध्ये मोठी लगबग =
अर्जुनी मोर. ( सुरेंद्रकुमार ठवरे) गेल्या तीन-चार वर्षांपूर्वीपासून पूर्णतः तयार झालेली पंचायत समितीची भव्य दिव्य इमारत लोकार्पणा अभावी धुळकात पडली होती. गेल्या चार वर्षापासून सदर इमारतीमध्ये इलेक्ट्रिक फिटिंग व पाण्याची व्यवस्था झाली नव्हती. इमारत बनवून इलेक्ट्रिक फिटिंग साठी चार वर्ष लागले आता निवडणुकीची आचारसंहिता लागण्याचे तयारीत असल्याने जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांना लोकार्पणाची लगीन घाई झाली असून २५ जानेवारीला लोकार्पण होणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे .अजूनही इलेक्ट्रिक फिटिंग चे काम सुरू असून फर्निचरची व्यवस्था सुद्धा करण्यात आली नाही. तरीही गुरुवारला होणाऱ्या लोकार्पणासाठी पंचायत समिती कर्मचाऱ्यांमध्ये लगबग दिसून आली आहे. या लोकार्पणाने २६ जानेवारीला ध्वजारोहण नवीन इमारती समोर होणार असे दिसत आहे.
अर्जुनी मोरगाव पंचायत समितीची स्थापना सन 1962 साली करण्यात आली. तेव्हापासून इंग्रज कालीन असलेल्या या इमारतीमध्ये तालुक्यातील ७१ ग्रामपंचायतचा कारभार सुरू होता. जुनी इमारत पूर्णता जर्जर झाली होती. अशा परिस्थितीतही पंचायत समितीचे कामकाज सुरू होते. दरम्यान तत्कालीन आमदार व माजी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांचे प्रयत्नाने व पुढाकाराने चार वर्षांपूर्वी पंचायत समितीच्या नवीन इमारत बांधकामासाठी 3 कोटी 70 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. या नवीन इमारतीचे बांधकामाचे भूमिपूजन देखील माजी मंत्री राजकुमार बडोले यांचे हस्ते करण्यात आले होते. यातच पंचायत समितीच्या जुन्या इमारतीला पाडून नवीन इमारतीच्या बांधकामाला सुरुवात करण्यात आली. तीन ते चार वर्षांपूर्वीच नवीन इमारतीचे बांधकाम पूर्ण करण्यात आले होते. मात्र सदर इमारती मधे इलेक्ट्रिक फिटिंग व पाण्याची व फर्निचर ची व्यवस्था करण्यासाठी तब्बल चार वर्षाचा कालावधी लागला. त्यामुळे लोकार्पणाचे काम रखडले होते. आता 2024 च्या निवडणुका येत आहेत. आचारसंहिता लागण्याचे मार्गावर आहे .अशातच पंधरा दिवसापूर्वी गोंदिया चे मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुनीला येऊन गेले व त्यांनी लोकार्पणाचा मुहूर्त काढल्याची माहिती आहे. त्यामुळे २५ जानेवारी लोकार्पणाची तारीख निश्चित झाल्याचे समजते. गुरुवारला लोकार्पण होत असले तरी इलेक्ट्रिक फिटिंग चे काम बाकी असून फर्निचर ची व्यवस्था सुद्धा होण्यास आहे. मात्र लोकार्पण झाल्यानंतर नवीन इमारतीमध्ये कामकाज सुरू होण्यास किती दिवस लागतात हे वेळच सांगणार आहे.