वडसा-गडचिरोली रेल्वे मार्गाच्या पहिल्या टप्प्याचे काम सुरू

0
27

गडचिरोली : वडसा ते गडचिरोली या 52 किलोमीटरच्या नवीन रेल्वे मार्गाच्या उभारणीचे काम वेगाने सुरू करण्यात आले आहे. खासदार अशोक नेते यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या या कामाला बुधवारी त्यांनी भेट देऊन पाहणी केली आणि सुरू असलेल्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले. यावेळी रेल्वेच्या अभियंत्यांनी त्यांना झालेल्या कामाची माहिती दिली.

वडसा ते आरमोरी यादरम्यान वन्यजीवांची वर्दळ राहत असल्यामुळे या मार्गावर रेल्वेसाठी पुलाची उभारणी केली जाणार आहे. त्यामुळे या प्रकल्पाची किंमत 1096 कोटी वरून 1888 कोटी रुपये झाली आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या प्रत्येकी 50 टक्के वाट्यातून उभारल्या जात असलेल्या या रेल्वेमार्गाच्या पहिल्या टप्प्यात 322 कोटी रुपयांच्या खर्चातून उभारल्या जाणाऱ्या 20 किमीच्या रेल्वेमार्गाच्या कामाला सुरुवात झाली. वडसा रेल्वे स्थानकापासून गडचिरोलीच्या दिशेने या कामाची सुरुवात करण्यात आली.

नेतेमंडळींच्या सहकार्याबद्दल व्यक्त केले आभार

अविकसित गडचिरोली जिल्ह्यात वडसा (देसाईगंज) हे एकमेव रेल्वे स्टेशन आहे. परंतु वडसा-गडचिरोलीपर्यंत 52 किलोमीटरच्या रेल्वे मार्गासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, विदर्भाच्या विकासासाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्यात अग्रेसर असलेले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे खा.अशोक नेते यांनी आभार व्यक्त केले. यासोबतच या कामात राज्य सरकारचा 50 टक्के वाटा असल्याने विकास कामात मोलाची भूमिका बजावणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस, तसेच वनमंत्री तथा तत्कालीन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची मोलाची भूमिका असल्याने त्यांचेही खा.नेते यांनी आभार मानले.

रेल्वेमार्गाचे काम वेळेत पूर्ण होईल

खा.अशोक नेते यांनी या कामाची गती पाहून समाधान व्यक्त केले. या कामासाठी आवश्यक असलेला निधी केंद्र आणि राज्य सरकारकडून वेळोवेळी मिळवून देण्यासाठी मी कटीबद्ध आहे. त्यामुळे वर्षानुवर्षे प्रलंबित असलेले हे काम लवकरात लवकर पूर्ण होऊन गडचिरोली आणि पुढे छत्तीसगड, तेलंगणापर्यंत या रेल्वे मार्गाचा विस्तार केला जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.