गोंदिया, दि.29 : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत ‘हाय ईम्पॅक्ट मेगा वॉटरशेड प्रोजेक्ट’ची गोंदिया जिल्ह्यातही अंमलबजावणी होणार असून यासाठी जिल्ह्यातील सहा तालुक्यांमध्ये पुढील पाच वर्षात हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत ‘हाय ईम्पॅक्ट मेगा वॉटरशेड प्रोजेक्ट’ च्या अंमलबजावणीकरीता नुकतीच जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांच्या अध्यक्षतेखाली समन्वय सभा घेण्यात आली. उपजिल्हाधिकारी (रोहयो) चंद्रभान खंडाईत, प्रकल्पाचे क्षेत्रीय समन्वयक नितेश बोपचे, समता निर्माण विशेतज्ञ अरविंद उईके, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी हिंदुराव चव्हाण, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.कांतीलाल पटले, सहायक जिल्हा माहिती अधिकारी कैलाश गजभिये यांची यावेळी प्रामुख्याने उपस्थिती होती.
या प्रकल्पाच्या अनुषंगाने मग्रारोहयो अंतर्गत ॲक्सीस बॅंक फाऊंडेशन आणि भारत रुरल लाइव्हलीवुड फाऊंडेशन आणि मनरेगा यांच्यात सामंजस्य करार झाला असून गोंदिया जिल्ह्यातील आमगाव, देवरी, सडक अर्जुनी (Intensive) आणि सालेकसा, अर्जुनी मोरगाव, तिरोडा (Non Intensive) अशा एकूण 6 तालुक्यांमध्ये ‘हाय ईम्पॅक्ट मेगा वॉटरशेड प्रोजेक्ट’ पुढील पाच वर्षापर्यंत राबविण्यात येणार असल्याचे बैठकीत सांगण्यात आले. महाराष्ट्रातील सुमारे एक लाख कुटूंबांचे उत्पन्न दुप्पट करणे तसेच 1.77 लक्ष हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणणे ही या उपक्रमाची प्रमुख उद्दिष्ट आहेत. राज्यातील 26 तालुक्यांमधील 878 मायक्रो वॉटरशेड यासाठी विकसित केली जाणार आहेत. ‘आजची मजुरी ही उद्याची समृध्दी आहे’ असे या प्रकल्पाचे घोषवाक्य आहे. अशी माहिती ‘हाय ईम्पॅक्ट मेगा वॉटरशेड प्रोजेक्ट’चे क्षेत्रीय समन्वयक नितेश बोपचे यांनी दिली.