जनजागृती ,तपासणी व उपचार ह्या त्रिसुत्रीने “स्पर्श ” कुष्ठरोग  जनजागृती अभियान यशस्वी करा

0
15

 कलंक कुष्ठरोगाचा मिटवु या, सन्मानाने स्विकार करुया  ह्याचा सर्वत्र जागर होणार
कुष्ठरोगाबाबतचे गैरसमज दूर करून लोकांनी जागृत होऊन आरोग्य तपासणी करुन घ्यावी
नागरिकांनी मनात कुठलीही भिती न बाळगता आरोग्य विभागाच्या सर्वेक्षणाला सहकार्य करावे

गोंदिया( दि.29 जानेवारी) : केंद्र व राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार दि. 30 जानेवारी ते 13 फेब्रुवारी 2024 या कालावधीत जिल्ह्यात स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियान राबविण्यात येणार आहे.अभियाना दरम्यान दरम्यान जनजागृती व सर्वेक्षणावर विशेष भर देण्यात येणार आहे. अभियाना दरम्यान नागरिकांनी कुष्ठरुग्ण आजाराबाबत गैरसमज व भिती न ठेवता आपल्याला होणारा त्रास न लपवता घरी येणार्या पथकाला सहकार्य करावे. जनजागृती,तपासणी व उपचार ह्या त्रिसुत्रीने स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियान यशस्वी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांनी जिल्हा आरोग्य प्रशासनाला दिले आहे. दि. 23 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील यांच्या उपस्थितीत जिल्हास्तरिय समन्वय सभा संपन्न झाली.
कुष्ठरुग्ण हा आजार संपुर्ण उपचाराने बरा होवू शकतो. म्हणुन नागरिकांनी प्राथमिक स्तरावर जाणवणारे लक्षणे आपल्या जवळच्या आरोग्य केंद्रात जावुन तपासणी करणे आवश्यक असल्याचे ह्याप्रसंगी म्हटले आहे. लवकर निदान,तत्पर उपचार केल्यास कुष्ठरुग्ण नक्कीच हमखास बरा होवु शकतो. ह्या आजारावरील औषधी सर्व सरकारी रुग्णालयात मोफत उपलब्ध आहे.
जिल्ह्याचे सहाय्यक संचालक(कुष्ठरोग) डॉ. रोशन राऊत यांनी मोहिमेचे सादरीकरण केले. कुष्ठरोगाचे प्रमाण दर १० हजारी १ पेक्षा कमी करणे, कुष्ठरोग विकृती दर्जा २ प्रमाणे शून्य आणणे, कुष्ठरोगाबाबत असलेली अंधश्रद्धा व गैरसमज दूर करणे, कुष्ठरोगाबाबतची जनजागृती ग्रामिण व शहरी भागांतील तळागाळापर्यंत पोहोचुन कुष्ठरोगमुक्त भारत हा संकल्प साध्य करणे हे या “स्पर्श” कुष्ठरोग जनजागृती अभियानाचा उद्देश आहेत. ह्या वर्षी अभियानात “कलंक कुष्ठरोगाचा मिटवु या, सन्मानाने स्विकार करुया ” ह्याचा सर्वत्र जागर होणार आहे.

महात्मा गांधी यांची पुण्यतिथी ३० जानेवारीला कुष्ठरोग निवारण दिन म्हणून साजरी करण्यात येणार आहे. या पंधरवड्यात नुक्कड नाटकद्वारे जनजागृती करण्यात येईल. तसेच जिल्ह्यातील रोगमुक्त झालेल्यांचे मनोगत, खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांची कार्यशाळा, शाळेमध्ये प्रार्थनेनंतर कुष्ठरोग बाबतच्या प्रतिज्ञांचे वाचन, शाळेतील सूचना फलकावर कुष्ठरोग बाबतचे संदेश, शाळा व गावांमध्ये नुक्कड-नाटक, प्रश्नमंजुषा स्पर्धा,निबंध स्पर्धा, कुष्ठरोगावरील गाणी, कविता वाचन, रांगोळी स्पर्धा, कटपुतली, चित्रकला स्पर्धा, पथनाट्य व कुष्ठरोगावरील म्हणी/घोषवाक्य स्पर्धा, शालेय विद्यार्थ्यांची प्रभात फेरी तसेच कुष्ठरोग दोड मॅरेथॉनचे आयोजन इत्यादी विविध कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी ह्याप्रसंगी दिली आहे. 30 जानेवारीला जिल्ह्यातील 547 ग्रामपंचायतींमध्ये होणाऱ्या ग्रामसभेत प्रतिज्ञा कुष्ठरोगविषयक संदेश देण्यात येणार आहे.
कुष्ठरुग्णांसोबत समाजात भेदभाव न होता सन्मानाने जगण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी प्रयत्न करावे व प्रत्येक कार्यक्रमात नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.
सामाजिक कारणाने कुष्ठरोग लपवण्याकडे लोकांचा विशेषतः महिला भगिनीचा कल असतो. आरोग्य  विभागाने सोशल मिडिया, सामाजिक संस्था व इतर माध्यमाद्वारे लोकांचे प्रबोधन करून योग्य उपचाराने हा आजार बरा होतो असा विश्वास देवून जास्तीत जास्त संशयित रुग्णांची तपासणी करावी. अशा सुचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अनिल पाटील यांनी यावेळी दिल्या. माननीय पंतप्रधान व राज्याचे आरोग्य मंत्री यांचे मार्गदर्शनाखाली सन २०२७ पर्यंत शुन्य कुष्ठरोग प्रसाराचे ध्येय गाठण्यासाठी सर्वांनी कटिबद्ध व्हावे असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी यावेळी केले.
जिल्हा स्तरिय सभेत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन वानखेडे. जिल्हा शल्यचिकित्सक, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन कापसे, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. निरंजन अग्रवाल,  जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. निरंजन अग्रवाल, जिल्हा साथरोग तज्ञ डॉ.सुशांकी कापसे, बालविकास विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय गणवीर,जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक अर्चना वानखेडे,जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयाचे कैलास गजभिये,जिल्हा आय.ई.सी अधिकारी प्रशांत खरात, अवैद्यकिय पर्यवेक्षक एन.डब्ल्यु.चकोले व पडोळे तसेच डॉ. संगिता भोयर ,डॉ.विजय राऊत,डॉ. अमित कोडनकर,डॉ. ललित कुकडे, डॉ.विनोद चव्हाण,डॉ.वेदप्रकाश चौरागडे ई.तालुका आरोग्य अधिकारी, ग्रामिण रुग्णालयाचे वैद्यकिय अधिक्षक तसेच लायन्स क्लब व रेड क्रॉस समितिचे सदस्य उपस्थित होते.