गोंदिया,- आमगाव तालुक्यातील भजियापार येथे असलेल्या डांबर प्लांटच्या विषारी धुरामुळे तसेच खदानामधील ब्लॉस्टिंगच्या वायू प्रदूषणामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.श्वसनाचा आजार जडलेल्या रुग्णांमध्येही वाढ झाली आहे.त्यातच ग्रामपंचायतीने ग्रामसभेच्या माध्यमातून परवानगी न देता मासिक सभेतून गौणखनिज उत्खनन व इतर प्लाँंटकरीता दिलेली मंजुरी रद्द करुन गावातील नागरिकांचे आरोग्य अबाधित राखण्यात यावे,या मागणीला घेऊन आज 1 फेबुुवारीला प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेंद्र भांडारकर यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
भजियापार गावालगत एक किलोमीटर अंतरावर डांबर प्लॉट आहे. या प्लॉटमधून निघणार्या विषारी धुरामुळे भजियापार, डोंगरगाव, सीतेपार, बुराडोटोला, नवेगाव, सुपलीपार, कट्टीपार येथील नागरिकांच्या श्वसन आजार होत आहे. लहान मुले, गर्भवती माता, वयोवृद्धांमध्ये हा आजार अधिक वाढला आहे. बर्याच जणांना हृदयाचा आजार जडला आहे. प्रदूषणामुळे शेती नापिक होत आहे. जवळच अंगणवाडी, शाळा आहे. तेथील विद्यार्थ्यांनाही याचा त्रास होत आहे. इतकेच नव्हे, तर ब्लॉस्टींगमुळे घरांना भेगा पडत आहेत. ग्रामपंचायतीने ब्लॉस्टिंग व प्लांट बंद करण्याचा ठराव दिला. पालकमंत्र्यांपासून स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय यंत्रणेकडे न्यायाची मागणी केली. मात्र, कुठलीच कार्यवाही झाली नाही, असा आरोप गावकर्यांनी आंदोलना दरम्यान केला आहे.