गोंदिया, दि.17 : सांस्कृतिक कार्य विभाग महाराष्ट्र राज्य व जिल्हा प्रशासन गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने १२ ते १६ फेब्रुवारी २०२४ दरम्यान स्व. इंदिरा गांधी स्टेडियम गोंदिया येथे आयोजित पाच दिवशीय महासंस्कृती महोत्सवाचा पाचवा दिवस महाराष्ट्राची लोकधारा असलेले प्रसिध्द गायक अनिरुध्द जोशी यांनी मराठी व हिंदी गीतांच्या सुमधूर गायनातून गाजवला. यावेळी त्यांच्या सुमधूर गाण्यावर श्रोत्यांनी जोरदार टाळ्यांनी भरभरुन प्रतिसाद दिला.
यावेळी अनिरुध्द जोशी यांनी प्रारंभी मलयगिरीचा चंदन-बुध्दीरुपी गोपाळा हे भुपाळी गीत सादर केले. त्यानंतर उजळून आलं आभाळ-गाव जागवीत आली वासुदेवाची स्वारी, दान पावलं-दान पावलं वासुदेवाला दान पावलं, लावुनी पाची बोटे घेवून येरे बा विठ्ठला-तु येरे बा विठ्ठला, आम्ही ठाकरं-ठाकरं या रानाची पाखरं, आधार कुणाचा नाही-खेळ मांडला देवा, आई भवानी तुझ्या कृपेने-गोंधळ मांडला गं आई गोंधळाला ये, उदग अंबाबाईचा-आम्ही ठाकरं-ठाकरं उघडते मी दारं, देवा तुझ्या दारी आलो-मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया, सूर निरागस हो-गणपती सूर निरागस हो-ओंकार गणपती-मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया, अधीपती-सुखपती-छंदपती-गणपती सूर निरागस हो, विठ्ठल-विठ्ल, माऊली-माऊली रुपं तुझे-आम्हा लेकरांची तु माऊली-पंढरीनाथ महाराज की जय, शतकाच्या अज्ञात उठली-अरुणोदय झाला, श्री छत्रपतीचा जय हो-जगदंबेचा जय हो, अरुणोदय झाला-अरुणोदय झाला, शिवछत्रपती महाराज या दरिया भवानीची भक्ती करा, खंडेरायाच्या लग्नाला भानू नवरी नटली, नवरी नटली बाई सुपारी फुटली, गणरायाच्या लग्नाला आले वऱ्हाडी कोण कोणं इत्यादी गीत प्रस्तुत केले. या सुमधूर गीतांना श्रोत्यांनी भरभरुन दाद दिली.
यानंतर अनिरुध्द जोशी यांनी आई तुझ्या गं चरणी-तुझ्या पायाशी आम्हा राहू दे-आई जगदंबे-आई जगदंबे हे गोंधळ सादर केले. वल्लव रे नखवा हो वल्लव रे रामा, मी डोलकरं-डोलकरं डोलकर दर्याचा राजा, मी बाई कोली-मुंबईच्या किनारी-चल जाऊ बाजारी-चल गं पारु हे कोळी गीत प्रस्तुत केले. यानंतर सुर तालात मी रंगुनी-अशी नटखट-मी लाजुनी आली तालात ही लावणी प्रस्तुत केली. त्यानंतर महाराष्ट्र माझा-जय महाराष्ट्र माझा, जय-जय महाराष्ट्र माझा-गरजा महाराष्ट्र माझा हे देशभक्तीपर गीत प्रस्तुत केले. या गीतांना प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत लोकशाही बळकट करण्यासाठी 18 वर्षावरील सुजाण नागरिकांनी निष्पक्षपणे निर्भय वातावरणात मतदान करणे आवश्यक आहे. याबाबत जिल्ह्यातील स्थानिक कलावंतांनी निवडणूक जनजागृतीपर पथनाट्टय सादर केले. गोंदिया जिल्हा हा महाराष्ट्राच्या पूर्व दिशेच्या अगदी टोकावर वसलेला आहे. जिल्ह्याला आदिवासी संस्कृतीचा वारसा लाभलेला आहे. आपल्या संस्कृतीचे जतन व्हावे यादृष्टीने नामवंत कलाकारांसोबतच जिल्ह्यातील स्थानिक कलावंतांना सुध्दा व्यासपीठ उपलब्ध व्हावे यासाठी राज्य शासनामार्फत महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
यावेळी प्रसिध्द गायक अनिरुध्द जोशी व त्यांचे सहकलाकार यांचा तत्कालीन जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व स्मृतीचिन्ह देवून सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन भैरवी देशपांडे यांनी केले. कार्यक्रमास पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, जिल्हा पुरवठा अधिकारी देवराव वानखेडे, तहसिलदार समशेर पठाण, अपर तहसिलदार विशाल सोनवणे यांचेसह रसिक बंधू-भगिनी, महाविद्यालयीन विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांचे आभार अपर तहसिलदार विशाल सोनवणे यांनी मानले.