Home विदर्भ जिल्हा विकास आराखड्यास जिल्हा नियोजन समितीची मंजूरी- पालकमंत्री धर्मरावबाबा आत्राम

जिल्हा विकास आराखड्यास जिल्हा नियोजन समितीची मंजूरी- पालकमंत्री धर्मरावबाबा आत्राम

0

गोंदिया, दि.22 : पुढील पाच वर्षाच्या विकासाचे नियोजन असलेला जिल्हा विकास आराखडा मंजूर करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीची सभा आज पालकमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या अध्यक्षतेखाली व्हिडिओ कॉन्फरन्सींगद्वारे घेण्यात आली. या बैठकीत पालकमंत्र्यांनी जिल्हा नियोजन समितीचा आढावा घेवून जिल्हा विकास आराखड्यास मंजुरी दिली आहे.

         सभेला आभासी पध्दतीने आमदार विनोद अग्रवाल, आमदार विजय रहांगडाले, जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात प्रत्यक्षपणे जिल्हाधिकारी प्रजित नायर, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरुगनंथम, जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल धोंगडे, समाज कल्याण सहायक आयुक्त विनोद मोहतुरे, प्रकल्प अधिकारी उमेश काशिद यांचेसह विविध विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

        पालकमंत्री श्री. आत्राम म्हणाले, राज्याच्या आर्थिक विकासात जिल्ह्याचे योगदान असणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने गोंदिया जिल्ह्याचा पुढील 5 वर्षाचा जिल्हा विकास आराखडा (District Strategic Plan)  विविध विभागाच्या माध्यमातून जिल्हा नियोजन समिती मार्फत तयार करण्यात आलेला आहे. सदर आराखड्यास आज मंजुरी प्रदान करण्यात येत आहे. सध्या गोंदिया जिल्ह्याचे राज्याच्या एकूण उत्पन्नामधील योगदान हे केवळ 0.7 टक्के एवढाच आहे. आपण 2027-28 पर्यंत हाच हिस्सा 1.3 टक्क्यावर नेण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. शाश्वत विकास ध्येय साध्य करण्याच्या अनुषंगाने जिल्हा विकास आराखडा तयार करण्यात आलेला आहे असे त्यांनी सांगितले.

        सदर जिल्हा विकास आराखड्यामध्ये जिल्ह्याची सद्यस्थिती, सॉट विश्लेषण (SWOT बलस्थाने, कमकुवतपणा, संधी, धोके), जिल्ह्याचे व्हिजन, प्रमुख भागीदारकांसोबत वेळोवेळी सल्लामसलत, क्षेत्र व उपक्षेत्रांची निवड, जिल्ह्याचा कृती आराखडा, आराखड्यामध्ये राज्य शासनाच्या आर्थिक समितीने केलेल्या शिफारशीचा अंतर्भाव केलेला असून कृषी व संलग्न सेवा (मत्सोत्पादन, पशुसंवर्धन, रेशीम उत्पादन), वने, उद्योग, कौशल्य विकास, पर्यटन, शिक्षण, आरोग्य, पायाभुत सुविधा, कायदा व सुव्यवस्था, समुदाय विकास, जलसंधारण इत्यादी क्षेत्र या आराखड्यात निश्चित केलेली आहेत. सन 2023-24 ते 2027-28 या पाच वर्षाचा जिल्हा विकास आराखडा तयार करण्यात आलेला आहे. सदर विकास आराखडा रुपये 842537.2 लक्षचा आहे. तसेच सन 2023-24 चा वार्षिक कृती आराखडा रुपये 102881.93 लक्ष इतका असून Financial Gap सुमारे 71799.26 लक्ष आहे असे जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी सांगितले.

Exit mobile version