जिल्ह्यातील लाखो नागरिकांनी उत्साहात घेतली मतदानाची शपथ

0
10

मतदारांनी निवडणुकीचा उत्सव साजरा करावा- जिल्हाधिकारी प्रजित नायर

  • प्रत्येकाने मतदान करण्याची घेतली शपथ
  • जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्य कार्यक्रम

      गोंदिया, दि.5 : ‘चुनाव का पर्व, देश का गर्व’ हे ब्रीद घेऊन आलेल्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत गोंदिया जिल्ह्याची मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी जिल्हा प्रशासन व जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालय, निमशासकीय कार्यालय, शाळा-महाविद्यालय व खासगी संस्थांमध्ये आज एकाच वेळी लाखों मतदार, नागरिक, शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी १९ एप्रिल रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत मतदान करण्याची शपथ घेतली. मी नक्की मतदान करणार व इतरांनाही मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करणार असा निर्धार लाखो नागरिकांनी या मोहिमेत केला. मतदान शपथ मोहिमेचा मुख्य कार्यक्रम जिल्हाधिकारी प्रजित नायर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आला.

         अठराव्या लोकसभा निवडणुकीत भंडारा-गोंदिया लोकसभेसाठी पहिल्या टप्प्यात 19 एप्रिल रोजी मतदान होणार असून लोकशाही बळकट करण्यासाठी सर्व मतदारांनी उत्साहात मतदान करावे व जिल्ह्याची मतदानाची टक्केवारी वाढवून निवडणुकीचा उत्सव साजरा करावा, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी कले.

          जिल्हाधिकारी कार्यालयात आज जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदान करण्यासाठी सामुहिकरित्या शपथ घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरुगानंथम, अपर जिल्हाधिकारी घनश्याम भूगावकर, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) किरण अंबेकर, उपजिल्हाधिकारी (सामान्य) मानसी पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी विजया बनकर, पोलीस उपअधीक्षक नंदिनी चानपूरकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. तानाजी लोखंडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) गोविंद खामकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालकल्याण) संजय गणवीर, स्वीपचे नोडल अधिकारी डॉ. महेंद्र गजभिये व शिखा पिपलेवार, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे यांची यावेळी प्रामुख्याने उपस्थिती होती.

         भारतीय निवडणूक आयोगामार्फत स्वीप कार्यक्रमांतर्गत मतदारांमध्ये निवडणूक प्रक्रियेची संपूर्ण माहिती व्हावी यासाठी लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी संपूर्ण देशात जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमांतर्गत नवमतदारांना मतदान प्रक्रियेत सहभागी करुन घेण्यासाठी प्रचार-प्रसार करण्यात येत आहे. तसेच निवडणूक प्रक्रिया सुलभ करुन प्रत्येक मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी व जिल्ह्याची मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी स्वीप कार्यक्रमांतर्गत विविध उपक्रम राबवून मतदानाचे महत्व पटवून देवून मतदान करण्यासाठी जनजागृती करण्यात येत आहे. आपण आपले भविष्य घडविण्यासाठी निश्चितपणे मतदान केले पाहिजे. आपल्या देशाला एक सशक्त राष्ट्र बनविण्यासाठी सर्वांनी मतदान करणे गरजेचे आहे. जिल्हा प्रशासनाकडून मतदान करण्यासाठी जनजागृती करण्यात येत असली तरी प्रत्येक नागरिकांनी स्वयंस्फुर्तीने मतदान करण्यासाठी पुढे येण्याची गरज आहे. मतदान करणे हा आपला अधिकार असून मतदान करणे हे आपले सर्वांचे कर्तव्य आहे. त्यामुळे सर्व कामे दूर सारुन जिल्ह्यातील प्रत्येक मतदारांनी 19 एप्रिल रोजी मतदान करुन जिल्ह्याची मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी आपले योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी केले.

        यावेळी जिल्हाधिकारी प्रजित नायर यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘‘आम्ही भारताचे नागरिक, लोकशाहीवर निष्ठा ठेवून याद्वारे प्रतिज्ञा करतो की, आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करु आणि मुक्त नि:पक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणुकांचे पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणुकीत निर्भयपणे तसेच धर्म, वंश, जात, समाज, भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करु’’ अशी सामुहिकरित्या शपथ घेण्यात आली. कार्यक्रमास जिल्हाधिकारी कार्यालयातील तसेच जिल्हा परिषद व इतर कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.