वाढदिवसाच्या शुभेच्छा
• सर्व पशूधनाचे इअर टॅग बंधनकारक
वाशिम,दि. 17 मे – सर्व पशुधनाची सर्वंकष माहिती एका ठिकाणी उपलब्ध व्हावी.जेणेकरुन पशुधनामधील सांसर्गिक रोगांना प्रतिबंध व नियंत्रण अधिनियमन 2009 च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी तसेच पशु व पशुधन उत्पादनात वाढ करण्याच्या दृष्टीने सर्व पशुधनाचे इअर टॅग करुन त्यांची नोंदणी भारत पशुधन प्रणालीवर करणे बंधनकारक असल्याचे आदेश जिल्हाधिकारी श्रीमती बुनवेश्वरी एस. यांनी पारीत केले आहे.
सर्व ग्रामपंचायत, नगरपरिषद, नगरपालीकांनी 1 जुन 2024 नंतर पशुधनास पशुवैद्यकीय संस्था/ दवाखान्यामधुन पशुवैद्यकीय सेवा देउ नयेत. तसेच आपल्या अधिनस्त असलेल्या कत्तलखान्यामध्ये टॅग असल्याशिवाय म्हैस वर्गीय जनावराची कत्तल करण्यास परवाणगी देण्यात येवू नये.
महसुल ,वन व महावितरण विभागांनी नैसर्गीक आपत्ती,विजेचा धक्का तसेच वन्य पशुच्या हल्ल्यामुळे मृत्युमुखी पडलेल्या पशुधनास इअर टॅग केलेले नसल्यास नुकसान भरपाईची रक्कम देय करु नये. कोणत्याही पशुधनाची वाहतुक इअर टॅग असल्याशिवाय करता येणार नाही. तसे केल्यास पशुधनाचे मालक व वाहतुकदार यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. परराज्यातुन येणा-या पशुधनास इअर टॅग केल्याची व त्याची नोंद भारत पशुधन प्रणालीवर घेतल्याची खातरजमा तपासणी नाक्यावरील पशुसंवर्धन विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी करावी. तसेच पशुधनास इअर टॅग करुन त्याची नोंद भारत पशुधन प्रणालीवर घेण्यात यावी. तसेच इअर टॅग नसलेल्या पशुधनाची बाजार समित्या, आठवडी बाजार व गावागावातील खरेदी विक्री व बैलगाडा शर्यती करण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे.
इअर टॅग नसलेल्या पशुधनास बाजार समिती मध्ये प्रवेश देण्यात येवू नये व त्याची खरेदी विक्री होणार नाही याची दक्षता संबंधीत बाजार समितीने घ्यावी. सर्व ग्रामपंचायत , महसुल व गृह विभाग यांनी इअर टॅग नसलेल्या बैलांना बैलगाडा शर्यतीमध्ये सहभाग घेण्यास परवानगी देउ नये.पशुधनाच्या मालकी हस्तांतरणा बाबतच्या नोंदी संबंधीत पशुवैद्यकीय अधिका-याकडुन त्वरीत अद्ययावत करुन घेण्याची जबाबदारी संबंधीत पशुपालकाची राहील. ग्रामपंचायतीमध्ये पशुच्या विक्री किंवा परिवर्तनाचा दाखला देतांना पशुधनाची इअर टॅग तपासावी. पशूधन हस्तांतरणाच्या दाखल्यावर इअर टॅगचा क्रमांक नमुद करण्यात यावा.पशुसंवर्धन विभागाने निर्गमित केलेल्या शासन निर्णयाचे अंमलबजावणी जिल्हयातील पोलिस विभाग, वन विभाग, महसुल विभाग, स्थनिक स्वराज्य संस्था जिल्हा परिषद महानगरपालीका कटक मंडळ, नगर परिषद,नगरपंचायत, ग्रामपंचायत, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, जिल्हाउपनिबंधक, सहकारी संस्था व सर्व अनुषंगीक प्रशासकीय विभागांनी काटेकोरपणे करावी.असे जिल्हाधिकारी तथा प्राणी संक्रमक व सांसर्गिक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियमाच्या सक्षम अधिकारी श्रीमती बुवनेश्वरी एस. यांनी कळविले आहे.