कृषि विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावे

0
515

गोंदिया, दि. 10 : एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान व राष्ट्रीय कृषि विकास योजनेअंतर्गत क्षेत्रीय स्तरावरुन 1 जून पासून विशेष पंधरवाडा मोहिम सुरु झाली आहे. या मोहिमेत कृषि विभागाच्या विविध योजनांचे लाभ प्राप्त करुन घेण्यासाठी अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करावेत.

         जिल्ह्यात फलोत्पादन व भाजीपाला पिकाचे क्षेत्र व उत्पादन वाढविण्याकरीता एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान व राष्ट्रीय कृषि विकास योजना राबविण्यात येत आहे. फलोत्पादन पिकाचा संशोधन, तंत्रज्ञान, प्रसार, काढणीत्तोर तंत्रज्ञान, प्रक्रिया व पणन सुविधा यांच्या माध्यमातून समुह पध्दतीने सर्वांगिण विकास करणे तसेच शेतकऱ्यांचे आर्थिक राहणीमान उंचावणे, पारंपारिक उत्पादन पध्दतीची आधुनिक शास्त्रीय ज्ञानाची सांगड घालुन तंत्रज्ञानाचा विकास व प्रसार आणि प्रचार करणे इत्यादी या योजनेचे उद्दिष्ट आहे.

         एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत पुष्पोत्पादन विकास कार्यक्रम- सुटी फुले, मसाला पिके लागवड- हळद लागवड, सामुहिक शेततळे, वैयक्तिक शेततळे अस्तरीकरण, फलोत्पादन यांत्रिकीकरण- ट्रॅक्टर संरक्षीत शेती- हरितगृह, प्लास्टीक मल्चिंग, कांदाचाळ, मधुमक्षिका पालन- मधुमक्षिका वसाहत संच वाटप, काढणीपश्चात व्यवस्थापन- पॅक हाऊस, एकात्मिक पॅक हाऊस, पुर्वशितकरण गृह, शितखोली, शितगृह, शितसाखळी, शितवाहन, रायपनिंग चेंबर इत्यादी घटकाकरीता अनुदान देय आहे. तसेच राष्ट्रीय कृषि विकास योजने अंतर्गत कांदाचाळ, शेततळे अस्तरीकरण, संरक्षीत शेती व भाजीपाला नर्सरी या बाबीसाठी अनुदान देय आहे.

         तरी शेतकऱ्यांनी https://mahadbtmahait.gov.in या ऑनलाईन संकेतस्थळावर जाऊन अर्ज करावेत. ऑनलाईन लॉटरीमध्ये निवड झाल्यानंतरच प्राप्त लक्षांकाच्या मर्यादेत तालुका कृषि अधिकारी यांचे मार्फत पुर्वसंमती देण्यात येईल. अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी अजित आडसुळे यांनी केले आहे.