
जिल्हा क्रीडा संकुल येथे हृदयघातावर प्राथमिक उपचार विषयावर कार्यशाळेेचे यशस्वी आयोजन
गडचिरोली: समस्त सक्षमिकरण बहुउ्ददेशिय विकास संस्थेद्वारा दि. 11 जून रोजी सायं. 06 वाजता स्थानिक जिल्हा क्रीडा संकुल येथे हृदयघातावर प्राथमिक उपचार या विषयावर मार्गर्शन तसेच प्रात्यक्षिक कार्यशाळेेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष व मार्गदर्शक जिल्हा सामान्य रूग्णालय गडचिरोलचे तज्ज्ञ डाॅ. मनिष मेश्राम, डाॅ. नागराज साखरे, डाॅ. यशवंत दुर्गे, डाॅ. बाळु सहारे, क्रीडा तालुका अधिकारी बडकेलवार, संस्थाध्यक्ष अॅड. भावना लाकडे, बाबा घुटके, मिलींद बांबोळे, केशव निमोंळ, भाऊराव भगत, राकेश चटगुलवार यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरूवात मान्यवरांच्या हस्ते महामानवांच्या प्रतिमेला माल्यापर्णन व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. तद्पश्चात सर्व उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देवून संस्थेच्या वतीने स्वागत करण्यात आले.
उपस्थितांना मार्गदर्शन करतांना डाॅ. मेश्राम म्हणाले की, सध्याच्या धकाधकीच्या जीवनशैलीमुळे संतुलित पोषक आहार तसेच व्यायामाच्या अभावामुळे पूर्वी विशेषतः प्रौढांमध्ये बघावयास मिळणारे हृदयविकार आता लहानवयातही उद्भवू लागले आहेत. अनेक संसर्गजन्य आजारांच्या तुलनेत हृदयघातासारखा गंभीर आजार हा दुर्लक्षित असल्याने वेळेवर उपचार न मिळाल्याने रूग्ण दगावण्याचे प्रमाण अधीक आहे. समाजामध्ये हृदयघाताविषयी जागृती निर्माण झाल्यास सी.पी.आर. तंत्र वापरून आपणही अनेकांचे जीव वाचवू शकतो. त्यामुळे सी.पी.आर.बाबत तांत्रिक प्रशिक्षण असणे गरजेचे आहे, असेही ते आपल्या मार्गदर्शनपर संबोधनात म्हणाले. तसेच संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेला हा उपक्रम निश्चितच प्रशंसनिय असल्याचेही त्यांनी नमुद केले. यानंतर उपस्थितांच्या प्रश्नांवर समाधानकारक मार्गदर्शनही डाॅ. मेश्राम यांच्या वतीने करण्यात आले.
तद्नंतर डाॅ. नागराज साखरे यांनी एखाद्याला हृदयघात झाल्यास सर्वप्रथम कशा पध्दतीने सीपीआर दिला जातो याचे तांत्रिक पध्दतीने डमीच्या सहायाने प्रात्यक्षिकाद्वारे समजावून सांगितले व उपस्थितानांही सदर डमीवर प्रात्यक्षिक करावयास दिले.
या कार्यशाळेस जिल्हा क्रीडा संकुल येथील खेळाडू, स्थानिक अभ्यासवर्गाचे विद्यार्थी तसेच पालकांची विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सुत्र संचालन श्रेयश सयाम यांनी तर आभार प्रदर्शन संस्थेचे सदस्य प्रशांत लाकडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी चित्रलेखा वाकुडे, सोनु खोब्रागडे, किर्तीकुमार खोब्रागडे, प्रविना लाडवे, अधीत देशपांडे, डिम्पल चुनारकर, बादल कंकलवार यांचे मोलाचे योगदान राहिले.