आता डिलिव्हरीची चिंता मिटली शासकीय दवाखान्यात गुणवत्तापूर्ण सेवा भेटली !

0
16
वाशिम,दि.१४ जून -शासकीय दवाखान्यातून भेटत असलेल्या गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवेमुळे बाळंतीण व त्यांच्या नातेवाईकांच्या चेहऱ्यावर “आता डिलिव्हरीची चिंता मिटली” ! “शासकीय दवाखान्यात गुणवत्तापूर्ण सेवा भेटली”! असल्याचे समाधान पसरल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे.
‘प्रसूती’ म्हटले की, आठवते माहेरपण आणि माहेरच्यांना लागून राहते काळजी ती लेकीबाळीच्या प्रसूतीची. प्रसूती नॉर्मल असो की सिझेरियन परंतु बाळंतपण म्हटले की, संपूर्ण कुटुंबला त्याचा आर्थिक भार उचलावा लागतो. आजही वाशिम जिल्ह्यातील बहुसंख्य ग्रामीण भाग हा शेती याच प्रमुख व्यवसायावर अवलंबून आहे आणि लेकीबाळीची प्रसूती ही माहेरी येऊनच करण्याचा शिरस्ता आहे. अशातच प्रसूती स्वाभाविक होणार की सिझेरियन याची चिंता घरच्यांना अगदी प्रसूतीपर्यंत लागून राहते आणि त्या सोबतीलाच असते चिंता ती खर्चाची. किमान ४० हजार ते एक लाख रुपयापर्यंत खर्च खाजगी क्षेत्रातील दवाखान्यात प्रसूती झाल्यास येतो.
मात्र अलीकडेच मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पांडुरंग ठोंबरे यांच्या एकत्रित प्रयत्नाने वाशिम जिल्ह्यातील चित्र बदलू लागले आहे. यापूर्वी आपल्या लेकीबाळीच्या प्रसूती खाजगी दवाखान्यात करण्याचा प्रघात होता. मात्र अलीकडे सरकारी दवाखान्यामध्ये गुणवत्तापूर्ण सेवा भेटत असल्याने आता ग्रामीण व शहरी भागातील मातांचा वाशिम जिल्ह्यामध्ये शासकीय दवाखान्यात प्रस्तुती करण्याकडे कल वाढला आहे. अगदी ग्रामीण स्तरावरील उपकेंद्र व प्राथमिक आरोग्य केंद्र तर तालुकास्तरावरील ग्रामीण रुग्णालय व जिल्हास्तरावरील जिल्हा स्त्री रुग्णालय यामध्ये माता ह्या मोठ्या विश्वासाने प्रसूती करिता येत आहेत व त्यांचे सुखरूप बाळंतपण होऊन सुदृढ मुले जन्माला येत आहेत असे चित्र सद्यस्थितीत दिसणाऱ्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.
मागील वर्षी एप्रिल व मे महिन्यात खाजगी दवाखान्यात प्रसूती होण्याचे सरासरी प्रमाण ४२ टक्के तर सरकारी दवाखान्यात प्रसूतीचे प्रमाण हे ५८ टक्के इतके होते. परंतु यावर्षी हेच प्रमाण खाजगी दवाखान्यात ३९ टक्के तर शासकीय दवाखान्यात ६१ % इतके झाले आहे. म्हणजेच मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी सरकारी दवाखान्यातील प्रसूतीच्या प्रमाणात तब्बल ३ % इतकी वाढ झाली असून खाजगी दवाखान्यातील प्रसुतीच्या प्रमाणात ३ % घट झाल्याचे दिसून येते आहे. परिणामी जिल्हास्तरीय शासकीय रुग्णालयामध्ये सिझेरियन प्रसूतीचे प्रमाण सुद्धा वाढले आहे. यापूर्वी एकेकाळी वाशिम जिल्ह्यातील मातांना सिझेरियनची आवश्यकता भासल्यास अकोला येथील शासकीय रुग्णालयात प्रसूतीस जावे लागायचे. आता मात्र जिल्हा स्त्री रुग्णालय वाशिम येथे गरोदर मातेसाठी सोनोग्राफी, रक्ताच्या तपासण्या, मोफत औषधोपचार इ. अत्याधुनिक सेवासुविधा उपलब्ध झाल्याने तसेच गरज पडल्यास सिझेरियनची सुविधा व रक्ताची व्यवस्था उपलब्ध असल्याने प्रसूतीकरिता वाशिम येथेच विश्वासाने थांबण्याकडे गरोदर मातांचा व त्यांच्या घरच्यांचा कल वाढला आहे. ग्रामीण व शहरी भागातील मातांना प्रभावी, सातत्य व गुणवत्तापूर्ण सेवा देण्यावर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.पी.एस. ठोंबरे यांचा भर असून त्यांनी तालुकास्तरीय बैठका घेऊन शासकीय आरोग्य कर्मचाऱ्यांना याबाबत सूचना दिल्या आहेत व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अनिल कावरखे यांनी आपली संपूर्ण यंत्रणा याकरिता प्रभावीपणे कार्यान्वित केली आहे. सर्वसाधारण रुग्णांना सुद्धा गुणवत्तापूर्ण सेवा मिळत असल्याने ग्रामीण व शहरी भागातून समाधान व्यक्त होत आहे.
 शासकीय आरोग्य अधिकारी कर्मचारी यांनी दवाखान्यात येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला आपुलकीच्या भावनेतून सेवा द्यावी. तसेच नागरिकांनीदेखील आपलाच दवाखाना समजून तेथील अधिकारी कर्मचारी यांना आवश्यक ते सहकार्य करावे व आरोग्य विभागामार्फत देण्यात येणाऱ्या मोफत सेवासुविधांचा लाभ घ्यावा. बालविवाह व गर्भलिंग निदान रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यावा व अशा बाबी प्रशासनाच्या वेळोवेळी निदर्शनास आणून द्याव्यात.
मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद वाशीम
सातत्य व गुणवत्तापूर्ण प्रभावी आरोग्य सेवा देण्यावर भर देण्यात येत असून याकरिता विवाहपूर्व व विवाहपश्चात समुपदेशन, गर्भसंस्कार, गरोदर मातेची नोंदणी, टी.डी. इंजेक्शन, नियमित भेटी, प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानांतर्गत स्त्रीरोग तज्ज्ञांकडून दरमहा तपासणी, गरोदर महिलांची मोफत रक्त व लघवी तपासणी, मोफत एक सोनोग्राफी तपासणी, तसेच आवश्यकतेनुसार मोफत औषधोपचार, बाळंतपणाच्या वेळी शासकीय दवाखान्यात ने-आण करण्याकरिता १०२ / १०८ नंबरच्या अॅम्ब्युलंस सेवा, दवाखान्यात भरती असेपर्यंत मातेस मोफत आहार, बाळाचे नियमित लसीकरण, इ. मोफत आरोग्य सेवासुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत.