नवेगावबांध येथील जलाशयात मान्सूनपूर्व तयारीची रंगीत तालीम

0
60

 गोंदिया, दि.14 : मान्सूनपूर्व तयारी 2024 च्या अनुषंगाने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, गोंदियातर्फे पूर परिस्थितीत शोध व बचावकार्य संबंधाने अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवेगावबांध येथील जलाशयात 14 जून 2024 रोजी शोध व बचाव पथकाद्वारे पूर परिस्थितीत सुरक्षा व बचाव तसेच पूर परिस्थितीत उपयोगी पडणारे शोध बचाव साहित्यांची तपासणी करून रंगीत तालीम घेण्यात आली.

           मागील वर्षी 2023 मध्ये राज्यात आलेली पूर परिस्थिती लक्षात घेऊन यावर्षी जिल्हा प्रशासनाकडून जिल्हाधिकारी प्रजित नायर यांच्या मार्गदर्शनात प्रत्येक तालुक्यात नागरिकांसाठी शोध व बचाव प्रशिक्षण कार्यक्रम व पूर परिस्थितीमध्ये सुरक्षा व बचाव या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहे. पूर परिस्थितीमध्ये जीवित व वित्तीय हानीचे प्रभाव कमी करण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, गोंदियातर्फे सदर कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. त्यानुषंगाने नागरिकांना पूर परिस्थितीमध्ये तात्काळ मदत पुरविण्यासाठी जिल्हा शोध व बचाव पथकातर्फे अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवेगावबांध येथे रंगीत तालीम व प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

          मान्सूनपूर्व तयारी 2024 च्या अनुषंगाने गावपातळीवर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात आली आहे. तसेच हवामान खाते व पूर परिस्थिती संदर्भात नागरिकांना व्हाट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून माहिती देण्याकरिता तालुका व गाव पातळीवर व्हाट्सॲप ग्रुप तयार करण्यात येत आहे.

         सदर रंगीत तालीम व प्रशिक्षण कार्यक्रमात अनिरुद्ध कांबळे तहसीलदार अर्जुनी मोरगाव, विजय हटवार उपकार्यकारी अभियंता जि.प.गोंदिया, राहुल टेंभुर्णे उपअभियंता, जितेंद्र सोरले, संजय शहारे, लुकेश पटले, शैलेश डोंगरे शाखा अभियंता जि.प.गोंदिया, दीपक परिहार अ.का. व  शोध बचाव पथकाचे सदस्य नरेश उईके, रविंद्र भांडारकर, संदीप कराडे, दिनू दिप, सुरेश पटले, दुर्गप्रसाद गगंगापारी, चालक मुकेश अटरे, होमगार्ड ट्रेनर इंद्रकुमार बिसेन, चुनीलाल मुटकुरे, पवन जगणे, गिरधारी पतैह, जबराम चिखलौंडे, चिंतामन गिरीपुंजे, मंडळ अधिकारी, तलाठी, कोतवाल, कर्मचारी व नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते.

जिल्हाधिकारी प्रजित नायर यांचे आवाहन….

नैसर्गिक आपत्तीचे संदेश आता SMS द्वारे

         जिल्ह्यातील पूर प्रवण 96 गावामधील नागरिकांसह जिल्ह्यातील सर्व नागरिकांना नैसर्गिक आपत्ती विषयक सूचना, संदेश, इशारा व माहिती प्राप्त करून घेण्यासाठी आपले चालू मोबाईल क्रमांक मधून खालील मोबाईल नंबर व लँडलाईन क्रमांकावर डायल करून आपले मोबाईल क्रमांक पंजीकृत करावे. 9404991599 किंवा 07182- 230196 वरील क्रमांकावर पंजीकृत मोबाईल धारकांना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, गोंदिया यांचेमार्फत विविध प्रकारच्या आपत्ती विषयक सूचना, संदेश, इशारा व माहिती चे SMS पाठविण्यात येणार आहेत. तरी सर्व नागरिकांनी आपले मोबाईल पंजीकृत करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी जिल्ह्यातील सर्व नागरिकांना केले आहे.