गोंदिया- गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे गोंदिया ग्रामीण भागासह गोंदिया शहरातही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. घरांचे नुकसान, शेतीचे नुकसान, आणि गावांचा संपर्क तुटण्याच्या घटना समोर आल्या आहेत. शहरातही वाहतुकीवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला.आमदार विनोद अग्रवाल यांनी गोंदिया शहरासह विशेषतः तालुक्यातील नदीकाठच्या गावांना आणि इतर गावांना भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. पाणी घरात शिरलेल्या कुटुंबांना आणि ज्यांची घरे अतिवृष्टीमुळे पडली आहेत, अशा सर्व नागरिकांना त्यांनी तातडीने मदतीचे आश्वासन दिले. याबाबत कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत व स्थानिक तलाठी, कोतवाल यांच्याशी त्यांनी बैठक घेतली आणि नुकसानग्रस्त लोकांची वैयक्तिक विचारपूस केली.
#एकही नुकसानग्रस्त वंचित राहणार नाही
आमदार अग्रवाल यांनी स्पष्टपणे सांगितले की, “एकही नुकसानग्रस्त शेतकरी किंवा नागरिक नुकसान भरपाईपासून वंचित राहणार नाही.” यासाठी स्थानिक तलाठ्यांना संपूर्ण पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. पंचनामे प्रक्रियेत कोणतीही हयगय होऊ नये, याची विशेष काळजी घेण्याचे निर्देश त्यांनी दिले.
आमदार विनोद अग्रवाल यांच्या दौऱ्यात गोंदिया शहरातील सेल्स टॅक्स कॉलनी, सूर्याटोला, बांधतलाव परिसर, रेल्वे तलाव परिसर, अंगूर बगीचा, टीबी टोली, अवंती चौक, तसेच विशेषतः नदीकाठच्या गावांचा आणि इतर गावांचा समावेश होता. या गावांमध्ये नुकसानग्रस्त नागरिकांना भेट देऊन त्यांनी स्थानिक प्रशासन, तलाठी, कोतवाल, कृषी सहाय्यक यांच्याशी चर्चा केली आणि मदत कार्यात गती देण्याचे आदेश दिले. अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या या गंभीर परिस्थितीवर आमदार विनोद अग्रवाल यांनी तातडीने कारवाई करून नागरिकांना दिलासा दिला आहे.