= शेकडो डफरीच्या आवाजाने अर्जुनी शहर निनादले
अर्जुनी मोर. -आदिवासी गोंड गोवारी जमात संविधानिक हक्क संघर्ष कृती समिती महाराष्ट्र राज्य तालुका अर्जुनी मोरगाव च्या वतीने 12 सप्टेंबरला आदिवासी गोंड गोवारी समाजाचा विराट मोर्चा तहसील कार्यालय अर्जुनी मोरवर धडकला. यावेळी तहसीलदारांना संघटनेच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले. या मोर्चाचे वैशिष्ट्य म्हणजे शेकडोच्या संख्येने असलेल्या डफळ्यांच्या आवाजाने संपूर्ण अर्जुनी मोरगाव शहर निनादून गेले होते.
अर्जुनी मोर तालुका आदिवासी गोंड गोवारी समाजाचा विराट मोर्चाची सुरवात दुर्गा चौक अर्जुनी मोर. येथुन झाली. पारंपारिक वेशभुषेत तालुक्यातील हजारोंच्या संख्येने आदिवासी गोंड गोवारी समाजाचे महिला पुरुष सामील झाले होते. आपल्या न्याय हक्कासंबधी प्रचंड नारे लावत व डफळीच्या तालावर नृत्य करुन शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हा मोर्चा तहशिल कार्यालयावर नेण्यात आला.अत्यंत शिस्तप्रिय या मोर्च्याचे हॅलीपॅड ग्राउंड वर सभेत रुपांतर करण्यात आले.यावेळी विविध मान्यवरांनी सभेला संबोदित करुन आपल्या न्याय मागण्या शासनस्तरावर पोहचवण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचे नावे असलेले निवेदन तहशिलदार यांना सुपूर्द केले.
आपल्या घटना दत्त वांशिक अस्तित्वाच्या अधिकारापासून दीर्घ काळापासून वंचित असलेली अत्यंत मागासलेल्या गोंड गोवारी जमातीचे प्रगतीचे व एकूणच सामाजिक जीवन जगण्याचे सर्व मार्ग बंद झाल्याने, वर्तमान काळात भयभीत व दिशाहिन समाज झालेला आहे. न्यायमूर्ती वडणे समिती महाराष्ट्र राज्य मुंबईला दिलेली दोन महिन्याची मुदत वाढ तात्काळ रद्द करावी, व त्यांना सात दिवसांची मुदतवाढ देऊन सकारात्मक अहवाल प्राप्त करावा. आणि आदिवासी विभाग शासन निर्णय क्रं. सी. बी. सी. 1684/(309) का. 11 मंत्रालय विस्तार भवन मुंबई 32 दिनांक 24 एप्रिल 1985 मधील गोंड गोवारी जमाती बद्दलची चुकीची व असंविधानिक माहिती वगळून त्या ठिकाणी माननीय सुप्रीम कोर्टाच्या 18/ 12 /2020 च्या निकालातील मुद्दा क्रमांक 83 मधील सांस्कृतिक माहिती व इतर संदर्भ ग्रंथाप्रमाणे दुरुस्ती करून संविधानिक गोंड गोवारी जमातीला त्यांचे सण 1950 पूर्वीचे महसुली पुरावे जरी गोवारी गयारी असे असले तरी त्यांना संविधानिक तरतुदीनुसार विना विलंब गोंड गोवारी अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र निर्गमित करावे, अनुसूचित जमातीचे सर्व लाभ पूर्ववत सुरू करावे, महाराष्ट्र शासनाने जाणीवपूर्वक भारतीय राज्यघटनेचे कलम 342 चे उल्लंघन करून गोंड गोवारी जमातीला लावलेले असंविधानिक क्षेत्र बंधन तात्काळ हटवावे या व इतर मागण्यासाठी संघटनेच्या वतीने आज तारीख 12 सप्टेंबरला अर्जुनी मोरगाव तालुक्यातील आदिवासी गोंड गोवारी समाजाने तहसील कार्यालयावर विराट मोर्चा काढला होता. या मोर्चाचे नेतृत्व आदिवासी गोंड गोवारी जमात संविधानिक हक्क संघर्ष कृती समिती अर्जुनी मोरगाव ने केली होती. निवेदन देतेवेळी आदिवासी गोंड गोवारी संस्कृती कल्याण मंडळ अर्जुनी मोर.चे तालुका अध्यक्ष गुरुदेव राऊत ,कार्याध्यक्ष प्रमोद नेवारे ,सचिव पुरुषोत्तम राऊत ,सहसचिव होमराज राऊत, गोपाल ठाकरे ,मार्गदर्शक मुरलीधर मानकर, गडचिरोली जिल्हाध्यक्ष विनायक वाघाडे, भगवान भोंडे नागपूर, अनंता नेवारे, दुर्गाबाई ठाकरे व समाजाचे इतर मान्यवर मंडळी उपस्थित होते. तर सभास्थळी अर्जुनी मोर्चे नगरसेवक दाणेश साखरे यांनी सुद्धा मोर्चाला हजेरी लावली.