समाजातील शेवटचा घटक न्यायापासून वंचित राहू नये-न्यायमूर्ती नितीन जामदार

0
49
  • विधी सेवा महाशिबीर व शासकीय योजनांचा महामेळावा

       गोंदिया, दि.17 : न्याय म्हणजे काय किंवा अन्याय झाला तर कुठे जायचे एवढीजरी माहिती मिळाली तरी न्यायाच्या दिशेने वाटचाल सुरू होते. आपल्या देशामध्ये संविधान आल्यानंतर समाजातील बऱ्याच घटकांना आपले हक्क काय आहेत याची माहिती नव्हती, त्यामुळे संविधानामध्ये सुधार करून आर्टिकल ३९-अ आणला गेला. यामध्ये मोफत आणि सक्षम न्याय मिळविण्याचा अधिकार सर्वांना प्राप्त झाला. ज्यामुळे आजच्या महाशिबिर हा न्यायाची वाटचाल करण्याचा अत्यंत महत्वाचा एक पाउल आहे. समाजातील पिडीत व्यक्तींसाठी सरकारविविध योजना राबविते, परंतु जोपर्यंत त्यांना माहित नसणार तोपर्यंत त्या सर्व योजना कागदावरच असतात. त्यामुळे अशाप्रकारच्या जनजागृती शिबिरामार्फत प्राथमिक माहिती पुरविण्याचा प्रयत्न केला जातो, असे उदगार न्यायमूर्ती नितीन जामदार, वरिष्ठ प्रशासकिय न्यायमूर्ती उच्च न्यायालय, मुंबई यांनी 14 सप्टेंबर रोजी पवार सांस्कृतिक भवन, गोंदिया येथे विधी सेवा महाशिबीर व शासकीय योजनांचा महामेळावा तसेच कायदेशीर मदत संरक्षण सल्लागार प्रणाली कार्यालयाचे उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले.

       राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकारण, उच्च न्यायालय, मुंबई यांच्या निर्देशानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा न्यायालय व जिल्हा प्रशासन गोंदिया यांचे संयुक्त विद्यमाने 14 सप्टेंबर 2024 रोजी पवार सांस्कृतिक भवन, गोंदिया येथे विधी सेवा महाशिबीर व शासकीय योजनांचा महामेळावा आयोजित करण्यात आला होता. सदर मेळाव्याचे उद्घाटन न्यायमूर्ती नितीन जामदार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी न्यायमूर्ती नितीन सांबरे, वरिष्ठ न्यायमूर्ती उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ नागपूर व न्यायमूर्ती महेंद्र चांदवाणी, उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ नागपूर तथा पालक न्यायमूर्ती न्यायीक जिल्हा गोंदिया उपस्थित होते. सदर कार्यक्रमापूर्वी मान्यवरांनी कायदेशीर मदत संरक्षण सल्लागार प्रणाली कार्यालयाचे गोंदिया न्यायालय परिसरात उद्घाटन केले.

        मेळाव्यास समीर अडकर, सदस्य सचिव, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांची उपस्थिती होती. तसेच जिल्हाधिकारी प्रजित नायर, पोलिस अधिक्षक गोरख भामरे, मुख्य कार्यकारी अधिकारी मुरुगानंथम एम., विभागीय वनाधिकारी तुषार ढमढेरे, इतर शासकीय विभागांचे अधिकारी व जिल्ह्यातील सर्व न्यायीक अधिकारी उपस्थित होते.

       मान्यवरांचे स्वागत जाम्यातिम्या विद्यालय गोरेगांव येथील शालेय विद्यार्थ्यांनी स्वागत गीताने केले. त्यानंतर मान्यवरांनी विविध शासकीय विभागांच्यास्टॉलचे उद्घाटन केले. कार्यक्रमादरम्यान   राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाचे गीत लावण्यात आले. कार्यक्रमाचा शुभारंभ व्यासपिठावरील उपस्थित मान्यवरांनी रोपट्यांना जल देवून केला. कार्यक्रमामध्ये शालेय विदयार्थ्यांनी स्वागत गीत गायले व सांस्कृतिक नृत्य केले. न्यायमूर्तींचा व इतर मान्यवरांचा सत्कार न्यायीक अधिकारी व वकील संघाच्या पदाधिकाऱ्यांनी केला.

       प्रास्ताविक भाषणात प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष अरविंद वानखेडे यांनी विधी सेवा व शासकीय महाशिबीर आयोजनामागील उद्देश उपस्थितांना सांगितला व विधी सेवा प्राधिकरणामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती दिली. तसेच त्यांनी ‘न्याय सर्वांसाठी’ हे विधी सेवा प्राधिकरणाचे घोषवाक्य आहे असे सांगितले. राष्ट्रीय स्तरापासुन ते तालुका स्तरापर्यंत विधी सेवा प्राधिकरण समितीची स्थापना करण्यात आली आहे असे सांगून समाजातील कोणतीही व्यक्ती किंवा घटक न्यायापासुन वंचित राहु नये हा भारतीय संविधानाचा मुळ उद्देश आहे असे सांगीतले.

        जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी त्यांच्या भाषणामध्ये नागरीकांनी महामेळाव्यातील विविध शासकीय योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन केले. न्यायमूर्ती महेंद्र चांदवाणी यांनी उपस्थितांना सामाजिक न्याय योजना, कृषी योजना, बचत गट योजना इत्यादी शासकीय योजनांचा लाभ घेवून स्वतःचा विकास करून घ्यावा, जीवनमान सुधारावे व मुख्य प्रवाहात यावे असे आवाहन केले. न्यायमूर्ती नितीन सांबरे यांनी शासनाच्या विविध योजनांबाबत नागरीकांना माहिती दिली. तसेच त्यांनी दिव्यांग जोडप्यांना प्रत्येकी 50 हजार रुपयाचे धनादेशाद्वारे अर्थसहाय्य देऊन सत्कार केला. तसेच त्यांनी गोंदिया जिल्ह्यात आढळणाऱ्या सारस पक्षांचे संरक्षण करण्यासंबंधी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

       न्यायमुर्ती नितीन जामदार यांचे हस्ते दोन दिव्यांग लाभार्थ्यांना गॅझेटचे वाटप आणि तीन दिव्यांग लाभार्थ्यांना यु.डि.आय.डी. (UDID) कार्ड तसेच दिव्यांग लाभार्थ्यांना प्रमाणपत्र आणि शालेय अंध विद्यार्थ्यांना Dozy Mobile चे वितरण केले. मान्यवरांनी सर्व स्टॉलची पाहणी केली. सदर कार्यक्रमाचा मुख्य हेतू कायदयाबाबतची माहिती नागरिकांना व्हावी आणि शासनाच्या विविध योजनांचा प्रचार व प्रसार व्हावा असा होता.

        कार्यक्रमासाठी जिल्ह्याच्या विविध भागातून बहुसंख्येने नागरीक व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमामध्ये सर्व तालुक्यातील वकील संघाचे पदाधिकारी व सदस्य हजर होते. कार्यक्रमामध्ये जिल्हा वकिल संघाचे अध्यक्ष टि.बी.कटरे, सचिव आर.ओ.कटरे, उपाध्यक्ष मेघा राहांगडाले तसेच सर्व तालुका वकिल संघाचे अध्यक्ष, तसेच वरिष्ठ वकील ओ.जी.मेठी व पी.सी.चव्हाण उपस्थित होते.

        कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्राजक्ता ढाणे व तेजश्री गवई यांनी केले. उपस्थितांचे आभार जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सदस्य नरेश वाळके यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता ए.एस.प्रतिनिधी, जिल्हा न्यायाधीश-१, एम.टी.आसिम जिल्हा न्यायाधीश-२, एन.डी. खोसे, जिल्हा न्यायाधीश-३, एस.आर.मोकाशी, सह दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, वाय.जे. तांबोळी, ४ थे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर आणि सर्व न्यायीक अधिकारी वर्ग, पी.पी. पांडे प्रबंधक, जिल्हा न्यायालय, गोंदिया, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गोंदियाचे कर्मचारी व इतर सर्व न्यायीक कर्मचारी इत्यादिंनी अथक परिश्रम घेतले. सदरचा महामेळावा अरविंद वानखेडे, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गोंदिया यांच्या अध्यक्षतेखाली यशस्वीरीत्या संपन्न झाला.