गडचिरोली जिल्ह्यात अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या पिक नुकसानीचे अनुदान मंजूर

0
91

आमदार कृष्णा गजबे यांच्या पाठपुराव्याचे यश

देसाईगंज:- गडचिरोली हा आदिवासी, दुर्गम, नक्षलग्रस्त व आकांक्षित जिल्हा असून जिल्ह्यात मोठे उद्योग व्यवसाय नसल्याने नागरीक प्रामुख्याने शेतीवर अवलंबून आहेत. भरपुर वनसंपदा व डोंगराळ गडचिरोली जिल्हयातुन वैनगंगा व तीच्या उपनद्या वाहतात. पुर्व विदर्भाचा विचार करता गडचिरोली जिल्ह्यात दरवर्षी मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होत असते. मागील वर्षीच्या माहे ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात परतीच्या पावसाने मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली तसेच भंडारा जिल्ह्यातील गोसिखुर्द धरणातून अचानक प्रचंड वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्यामुळे वैनगंगा व तीच्या उपनद्यांनी रौद्र रूप धारण केल्याने आरमोरी, वडसा तालुक्यासह गडचिरोली जिल्ह्यातील नदि काठावरील व लगतच्या शेतातील हाता-तोंडाशी आलेल्या धान पिकांचे अतोनात नुकसान झाले. त्याअनुषंगाने विभागिय आयुक्त, नागपूर विभाग नागपूर यांनी दि. 26 एप्रिल 2024 रोजी नुकसान भरपाई अहवाल शासनाकडे सादर केला. परंतु माहे मार्च ते जून 2024 मध्ये लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता सुरू असल्याने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मीळु शकलेली नाही. सदर नुकसानीच्या अनुषंगाने मा. विभागिय आयुक्त नागपूर विभाग नागपूर यांनी संदर्भिय पत्रकान्वये गडचिरोली जिल्ह्यातील एकुण 5557 शेतकऱ्यांचे 3250.00 हे. आर शेतपिकांचे नुकसान झाले असून त्याकरिता रुपये 4,33,43,625/- चा नुकसान अनुदान प्रस्ताव शासनाकडे सादर केलेला होता. त्यामध्ये आरमोरी मतदार संघातील आरमोरी व वडसा तालुक्याच्या नदिकाठवरील सर्वाधिक शेतकऱ्यांचा समावेश होता.
परंतु माहे ऑगस्ट व सप्टेंबर 2023 मध्ये झालेल्या नुकसानीचा प्रस्ताव लोकसभा निवडणूक व त्यानंतर लगेच राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन असल्याने बराच कालावधी लोटुनही शासनाकडे प्रलंबित राहिला. ही गंभीर बाब लक्षात येताच आमदार कृष्णा गजबे यांनी मा. मंत्री मदत व पुनर्वसन मंत्री यांना दि. 16/07/2024 रोजीच्या निवेदनाद्वारे आदिवासी, दुर्गम नक्षलग्रस्त व आकांक्षित गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्राधान्याने नुकसान भरपाईदेण्याची विनंती केली. सदर आशयाचे निवेदन राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री गडचिरोली जिल्हा यांनाही देण्यात आले व त्याकरिता त्यांचा सातत्याने पाठपुरावा सुरू होता. सदर पाठपुराव्याला यश आले असून महसूल व वन विभाग, मंत्रालय मुंबई यांच्या शासन निर्णय क्र सीएलएस २०२३ / प्र.क्र.२८६/म-३ , दि. ५ सप्टेंबर २०२४ नुसार मागीलवर्षी माहे ऑगस्ट व सप्टेंबर 2023 मध्ये अतिवृष्टी, वैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे नुकसान झालेल्या जिल्ह्यातील ५५५७ शेतकऱ्यांना ४ कोटी ३३ लक्ष तसेच डीसेंबर २०२३ मध्ये अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या १००३ शेतकऱ्यांना १ कोटी ६ लक्ष रुपयांची नुकसान भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शासन धोरणानुसार सदर नुकसान भरपाई महाडिबीटी पोर्टल वरुन थेट शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा होणार असल्याने ज्या शेतकऱ्यांची बॅंक खात्याशी आधार लींक ई-केवायसी झाली नसल्यास त्यांनी ई-केवायसी करुन घेणे आवश्यक असल्याचे आमदार कृष्णा गजबे यांनी प्रतिपादीत केले आहे. आरमोरी मतदार संघासह संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यातील नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मंजूर केल्याबद्दल आमदार कृष्णा गजबे यांनी राज्याचे मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस, नामदार अजित पवार व मदत पुनर्वसन मंत्री नामदार  अनिल पाटील यांचे आभार मानले व नुकत्याच झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनाही तातडीने नुकसान भरपाई मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.