: स्वच्छता ही सेवा उपक्रमांचा शुभारंभ
गोंदिया, ता. 17 : घरातला कचरा बाहेर फेकला की कुटूंबाची जबाबदारी संपली. ग्रामपंचायतीमधील कचरा गावाबाहेर रस्त्याच्या कडेला फेकला की सरपंचाची जबाबदारी संपली. रस्त्याच्या शेजारचा कचरा प्रशासनाने कुठेतरी फेकला तर त्यांची पण जबाबदारी संपते. मग हा कचरा नदी, नाल्यात जावून प्रदूषण वाढवितो. त्यामुळे कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करा, घरातील निघणाऱ्या कचऱ्यासह गावातील स्वच्छतेची जबाबदारी स्वीकारा, असे आवाहन जिल्हा परिषद चे मुख्य कार्यकारी अधिकारी मुरूगानंथम एम. यांनी केले.
स्वच्छता ही सेवा – 2024 या उपक्रमांचा जिल्हास्तरीय शुभारंभ कार्यक्रम आज (ता. 17) सकाळी 8.30 वाजता गोंदिया पंचायत समिती अंतर्गत ग्रामपंचायत अंभोरा येथे पार पडला. त्यावेळी मार्गदर्शन करतांना ते बोलते होते. ग्रामपंचायतीच्या सरपंच श्रीमती जाननबाई लक्ष्मण चौधरी, उपरसंपच श्रीमती सारिकाबाई दुर्गेश सावनकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तानाजी लोखंडे, पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंदराव पिंगळे, गटशिक्षणाधिकारी पी.पी. समरीत, मुख्याध्यापक श्री. वैरागडे, शालेय शिक्षण व तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष चोपलाल तुरकर यावेळी मंचावर उपस्थित होते. आपण सण, उत्सव, शासकीय उपक्रमांचा लाभ घेण्यासाठी एवढेच नव्हे; तर निवडणूकांसाठी सुध्दा एकत्र येतो. मग कचरा संपविण्यासाठी एकत्र का येत नाही? असा सवाल उपस्थित करून श्री. मुरूगानंथम पुढे म्हणाले की, प्लास्टीक कचजऱ्याच्या वापरामुळे संपूर्ण पर्यावरण धोक्यात आले आहे. प्लास्टीकला आता आपल्या आयुष्यातून हद्दपार केले पाहीजे. त्यासाठी सर्वांनी एकत्र येवून आपल्या गावासह जिल्हयाला स्वच्छ आणि कचरामुक्त करण्याचा संकल्प करावा. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तानाजी लोखंडे यांनी स्वच्छता अभियानाचा इतिहास सांगून महाराष्ट्राने देशाला स्वच्छतेची मोहीम दिली. त्यामुळे स्वच्छतेच्या बाबतीत महाराष्ट्र अग्रेसर ठेवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे मत त्यांनी व्यक्त केले. आरोग्य बिघडवून डॉक्टरांचे घर मोठे करण्यापेक्षा गावात, परिसरात स्वच्छता पाळून सुदृढ आरोग्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन करून उपमुख्य कार्यकारी आनंदराव पिंगळे यांनी स्वच्छतेच्या या दिंडीचे वारकरी होण्याचे मत व्यक्त केले. स्वच्छता ही सेवा उपक्रमांची संपूर्ण माहिती सुध्दा त्यांनी आपल्या प्रास्ताविकातून दिली. सरपंच जाननबाई चौधरी यांनी गावाची स्वच्छतेसाठी निवड केल्याबद्दल आनंद व्यक्त करून गावात शाश्वत स्वच्छतेचा मानस व्यक्त केला. ग्रामसेवक डी.एस. रेवतकर यांनी समायोचित विचार व्यक्त केले. दरम्यान सूत्रसंचालन करून माहिती, शिक्षण व संवाद तज्ञ अतुल गजभिये यांनी उपस्थितांना स्वच्छतेची शपथ दिली. पाणी व स्वच्छता विभाग, पंचायत समिती गोंदिया आणि जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांसह गावकरी यावेळी मोठयासंख्येने उपस्थित होते.
भर पावसांत स्वच्छतेची शपथ
गोंदिया शहरात सकाळपासूनच पावसाची रिपरिप सूरू होती. तरी सुध्दा स्वच्छतेच्या या उपक्रमाच्या शुभारंभ सोहळयात नागरीकांची मोठयासंख्येने उपस्थिती होती. उद्घाटन सोहळा ऐन रंगात असतांना मुसळधार पावसाने दमदार हजेरी लावली. पावसाचा जोर असतांनाच दरवर्षी शंभर तास म्हणजेच प्रत्येक आठवडयातून 2 तास श्रमदान करण्याचा गावकऱ्यांनी संकल्प घेतला. कुटूंब, गल्ली, वस्ती तथा स्वत:चे गाव आणि कार्यस्थळापासून स्वच्छतेच्या कामाला सुरवात करण्याची तथा स्वच्छ भारत मिशनचा प्रचार करण्याची शपथही यावेळी गावकऱ्यांनी घेतली.
एक पेड मॉ के नाम
स्वच्छतेच्या या उपक्रमात संपूर्ण जिल्हयात प्रत्येक ग्रामपंचायतींने किमान 10 वृक्षांचे रोपण करण्याचे निर्देश यापूर्वीच देण्यात आलेले आहेत. अंभोरा ग्रामपंचायतीमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी मुरूगानंथम एम, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तानाजी लोखंडे आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंदराव पिंगळे यांच्या हस्ते शाळेच्या मैदानात विविध प्रजातींच्या वृक्षांचे रोपण करुन ‘एक पेड मॉ के नाम’ या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.