शेतमजूर युनियनची तहसीलदार कार्यालयावर धडक

0
44

गोरेगाव ः प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांना थकित देयके देण्यात यावे, यासह अन्य मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य लाल बावटा शेतमजूर युनियन गोरेगाव तालुकाच्या वतीने बुधवारी (ता. १८) तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचे नेतृत्व राज्य उपाध्यक्ष हौसलाल रहांगडाले, कल्पना डोंगरे, चरणदास भावे यांनी केले.
किसान सन्मान निधी देण्यात यावा, वनजमिनीवर अतिक्रमण केलेल्यांना मालकीचे पट्टे देण्यात यावे, भूमिहीन शेतमजुरांना वयाच्या ५५ वर्षांपासून सहा हजार रुपये पेन्शन योजना लागू करण्यात यावी, श्रावणबाळ, राजीव गांधी अर्थसहाय्य योजनेचे प्रलंबित अर्ज निकाली काढण्यात यावे, मनरेगा कामाचे थकित वेतन देण्यात यावे, २०० दिवस काम देण्यात यावे आणि ६०० रुपये मजुरी देण्यात यावी, प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांना थकित देयके देण्यात यावे आदी मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला. मोर्चात गुणवंत नाईक, चैतराम दियेवार, बाबुलाल शहारे, नेवल मारगाये, पारबता आगरे, रायाबाई मारगाये, गुलाब शहारे यांच्यासह शेतमजूर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.