एनसीडीसी मार्फत गोंदिया जिल्ह्यातील मच्छीमारांना मार्गदर्शन

0
36

गोंदिया,दि.२३ः-‘एनसीडीसी’ चे लक्ष्मणराव इनामदार ‘नॅशनल अकॅडमी फॉर को-ऑपरेटिव्ह रिसर्च अँड डेव्हलपमेंट प्रशिक्षण केंद्र’ आणि केंद्र शासनाच्या मत्स्य व्यवसाय विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मच्छीमारांसाठी गोंदिया येथील भवभूति रंगमंच सभागृहात प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.

पंतप्रधान मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत आयोजित या कार्यशाळेला प्रशिक्षणा दरम्यान मुख्य अतिथी म्हणून महाराष्ट्र शासनाच्या मत्स्यव्यवसाय विभागाचे सहाय्यक आयुक्त कैलास मारबते,राष्ट्रीय सहकारी विकास निगम पुणेचे उपसंचालक रविंद्र शिंदे, भंडारा जिल्हा मत्स्य व्यवसाय सहकारी संघाचे संचालक विनोद कागदीमेश्राम, जिल्हा उपनिबंधक प्रशांत सोनारकर उपस्थित होते.

जिल्हा मत्स्य व्यवसाय सहकारी संघाचे संचालक विनोद कागदीमेश्राम यांनी एनसीडीसी मार्फत राबविण्यात येत असलेली मत्स्य शेतकरी उत्पादक संस्था (FFPo) जिल्ह्यातील बऱ्याच मच्छीमार संस्थाना FFPo दर्जा नुसार अनुदान परत फेड न करता मिळणारे व्यवस्थापण खर्च ५ लक्ष रुपये व भागभांडवल अनुदान २ लक्ष रुपये मिळणार असल्याची माहिती दिली. गुणवत्ता पूर्ण बीज निर्मिती, बीज संकलन त्याची उपलब्धता मत्स्य व्यवसायातील यशाचा गाभा आहे. मच्छीमार बांधवांनी कोल्ड स्टोरेज, मत्स्य विपणन, माशांची बाजारपेठेतील उपलब्धता या बाबीकडे लक्ष देणे आवश्यक आहे. मत्स्यव्यसायात महिलांचे प्रमाण अत्यल्प असून महिलांनी एकत्र येऊन मत्स्य सहकारी संस्था स्थापन करायला हव्यात असेही त्यांनी सांगितले.

मच्छीमार बांधवांसाठी झालेल्या प्रशिक्षणामध्ये महाराष्ट्र शासनाच्या मत्स्यव्यवसाय विभागाचे सहाय्यक आयुक्त कार्यालयाचे कोमल नंदागवळी यांनी मच्छीमार संस्थांना किसान क्रेडिट कार्ड, अपघात गटविमा तसेच पंतप्रधान मत्स्य संपदा योजनेअंतर्गत येणाऱ्या विविध राज्य शासनाच्या योजनांची माहिती दिली. तसेच सीबीबीओचे कन्सल्टंट विनायक कुंभार यांनी PFCS ते FFPO चे बळकटीकरन, योजना अमलात आणताना संस्थाना येणाऱ्या अडचणीतून मार्ग कसे काढावे, अनुदान मिळण्यासाठी प्रस्ताव कसे तयार करावे याबरोबरच NFDP मध्ये नोंदणी आणि LIFIC च्या ट्रेनिंग मध्ये मोठ्या प्रमाणत मत्स्य व्यवसायिकानी सहभाग घेण्यासाठी आवाहन केले.

कार्यशाळेची सांगता करताना एनसीडीसी यंग प्रोफेशनल अमोल भडके यांनी एनसीडीसीकडून मिळणाऱ्या योजनेच्या लाभ घेण्याकरिता आश्र्वासित करत भविष्यात येणाऱ्या नवीन योजनेची माहिती देण्यात आली.विकास मत्स्यपालन सहकारी संस्था वाकेश्वरचे संचालक अनिल दिघोरे यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना करून मान्यवरांचे स्वागत केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य मच्छीमार संघाचे प्रतिनिधि दिपक मारबते,प्रतिक दंडीमे,गुंजन रहमतकर व परेश दुरुगवार यांचे योगदान लाभले.