गोंदिया, दि.24 : बाजारातून कोणतीही वस्तु खरेदी करतांना आपली फसवणूक होऊ नये म्हणून ग्राहकांनी आपले अधिकार व हक्काबाबत नेहमी जागरुक राहावे, असे प्रतिपादन जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे सचिव अतुल अळशी यांनी केले.
अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाद्वारे 24 डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित ‘राष्ट्रीय ग्राहक दिन’ कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी सतीश अगडे, सहायक मोटर वाहन निरीक्षक स्वप्नील कुरसूंगे, सहायक जिल्हा माहिती अधिकारी कैलाश गजभिये, ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष नारायण बावणकर, अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे संघटक योगेश्वर सोनुले, जिल्हा ग्राहक तक्रार मंचच्या संघटिका शारदा सोनकवरे व अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे सचिव संजीव बापट मंचावर उपस्थित होते.
अतुल अळशी पुढे म्हणाले, ‘‘ग्राहक म्हणून आपले अधिकार आणि हक्क याबाबत जागरुक व्हा’’ अशी संकल्पना आहे. ग्राहकांची फसवणूक होऊ नये म्हणून ग्राहकांच्या हिताकरीता ग्राहक संरक्षण कायदा 2019 तयार करण्यात आलेला आहे, त्याचे पालन करण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकांची आहे. नागरिकांनी कोणताही व्यवहार करतांना किंवा सेवा घेतांना बिले, विमा पॉलीसी संबंधी असल्यास मुळ पॉलीसी घेणे आवश्यक आहे. जेणेकरुन आपली फसवणूक झाल्यास संबंधीत प्राधिकरणाविरुध्द तक्रार दाखल करणे नागरिकांना सोईचे होईल. जिल्हा ग्राहक आयोगामध्ये ग्राहकांच्या तक्रारींचा निपटारा अतिशय जलद गतीने केला जातो. 2019 च्या नवीन सुधारीत कायदयाच्या तरतुदीत भर पडल्यामुळे आता प्रकरणामधील वादाचा निपटारा जलद गतीने मध्यस्थी कक्षाचे मार्गाने करण्याचे प्रावधान आहे. बाजारातून कोणतीही वस्तू खरेदी करतांना ग्राहकांनी दुकानदाराला बील मागणे हे आपले कर्तव्य आहे. शाळा व महाविद्यालयात ग्राहकांच्या हक्काबाबत जनजागृती करण्यात यावी. प्रत्येक नागरिकाला कायद्याचे ज्ञान असणे आवश्यक आहे असे त्यांनी यावेळी सांगितले.
शारदा सोनकवरे म्हणाल्या, ग्राहकांची फसवणूक होणार नाही यासाठी ग्राहकांनी नेहमी जागरुक राहावे. ग्राहकांच्या हितासाठी कायदा तयार व्हावा यासाठी बिंदू माधव जोशी यांची महत्वाची भूमिका होती. ग्राहकांच्या हितासाठी ग्राहक संरक्षण पंचायत समिती जिल्ह्यात कार्यरत असून सदर समिती ग्राहकांच्या हितासाठी सदैत्व तत्पर आहे. ग्राहक हा पैशाच्या आर्थिक परिस्थितीचा एक दुवा आहे. महिला जर जागरुक असली तर संपूर्ण कुटूंबाचे व्यवस्थीत सांभाळ करते. जिल्ह्यात ग्राहक संरक्षण समिती स्थापन करण्यात आलेली नसल्यामुळे अशा समितीचे गठण करण्यात यावे अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. ज्या नागरिकांचे आधारकार्ड अपडेट नसेल त्यांच्याकरिता शिबिरे आयोजित करण्यात यावी. रेशन दुकानातून नागरिकांना सुरळीत धान्य पुरवठा होत नाही अशी बऱ्याच ग्राहकांची तक्रार आहे, तसेच बाजारामध्ये दुकानदारांचे वजन काटे दोषपूर्ण आहेत, विविध मेडिकल स्टोर्समधील औषधांच्या किंमतीमध्ये तफावत आढळून येत आहे याकडे जिल्हा प्रशासनाने विशेष लक्ष द्यावे असे त्यांनी सांगितले.
कैलाश गजभिये म्हणाले, ग्राहक म्हणून आपले अधिकार आणि हक्क याबाबत सदैव जागरुक रहावे. वाजवी किंमत आणि शुध्दता या ग्राहकाच्या मुख्य गरजा आहेत. ग्राहकांना त्यांचा हक्क मिळावा यासाठी ग्राहक संरक्षण कायदा बनविला गेला आहे. या कायद्यानुसार आता कोणताही ग्राहक अनुचित व्यापाराची तक्रार करु शकतो. यासाठी त्यांना पूर्ण अधिकार देण्यात आले आहेत. पूर्वीच्या काळात व्यावसायिकांच्या व्यवहारात होणारी हेराफेरी लक्षात घेऊनच हा कायदा तयार करण्यात आलेला आहे. दरवर्षी 15 मार्च रोजी जागतिक ग्राहक दिन साजरा केला जातो. तर भारतात दरवर्षी 24 डिसेंबरला ‘राष्ट्रीय ग्राहक दिन’ साजरा केला जातो. सुरक्षेचा हक्क, माहिती मिळविण्याचा हक्क, निवड करण्याचा हक्क, मत मांडण्याचा हक्क, तक्रार आणि निवारण करण्याचा हक्क, ग्राहक हक्काच्या शिक्षणाचा हक्क असे ग्राहकांच्या हिताकरीता विविध हक्क तयार करण्यात आलेले आहेत असे त्यांनी सांगितले.
योगेश्वर सोनुले म्हणाले, ग्राहक सरंक्षण कायदा 2019 या कायद्यामध्ये नविन तरतुदींचा समावेश करण्यात आलेला आहे. स्वदेशी वस्तुंचा वापर करा व परदेशी वस्तूंचा बहिष्कार करा. आपण आत्मनिर्भर होवून स्वत:च्या तक्रारी मांडल्या पाहिजेत. प्रत्येक समाजातील घटकांना ग्राहक संरक्षण कायद्याची जाणिव असणे आवश्यक आहे. ग्राहक चळवळ वाढावी याकरीता जिल्ह्यात जिल्हा ग्राहक संरक्षण समितीचे गठण करण्यात यावे असे त्यांनी सांगितले.
यावेळी सहायक मोटर वाहन निरीक्षक स्वप्नील कुरसूंगे, ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष नारायण बावणकर व अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे सचिव संजीव बापट यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ वजन व मापे कार्यालय, उपप्रादेशिक परिवहन कार्यालय तसेच पेट्रोलची शुध्दता व मोजमाप यंत्र याबाबत स्टॉल्स लावण्यात आले होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा पुरवठा अधिकारी सतीश अगडे यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पुरवठा निरीक्षक हेमराज शहारे यांनी केले तर उपस्थितांचे आभार पुरवठा निरीक्षक कमलेश मेश्राम यांनी मानले. कार्यक्रमास निरीक्षक अधिकारी सचिन काळे, वीज महावितरणचे कार्यकारी अभियंता आनंद जैन, ग्राहक पंचायतचे पदाधिकारी, रेशन दुकानदार व रेशनधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते.