- जिल्हाग्रंथालय अधिकारी कार्यालयात ग्रंथप्रदर्शनीचे उद्घाटन
गोंदिया, दि.2 : वाचन संस्कृतीच्या विकासाने तरुणांच्या व्यक्तीमत्वाचे भरणपोषण होण्यास मदत होते. अलीकडच्या काळात देशाचा तरुण वाचन संस्कृतीपासून दुरावत चाललेला असल्याचे दिसून येत असल्यामुळे तरुण पिढीला प्रत्यक्ष ग्रंथ वाचनाकडे आकर्षित करण्याची आवश्यकता आहे. विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती जोपासण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभागाद्वारे राबविण्यात येणाऱ्या ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ हा स्तुत्य उपक्रम आहे, असे प्रतिपादन मनोहर म्युन्सीपल हायस्कुल गोंदिया चे प्राचार्य भुवनकुमार बिसेन यांनी केले.
आज नविन प्रशासकीय इमारतीतील जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात आयोजित ग्रंथप्रदर्शनी कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी श्वेता पोटूडे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी मिनाक्षी कांबळे व ग्रंथालय निरीक्षक अस्मिता मंडपे उपस्थित होते.
प्राचार्य बिसेन म्हणाले, मराठी ही महाराष्ट्र राज्याची मातृभाषा आहे. गोंदिया जिल्ह्यात बहुतांशी हिंदी भाषेचा वापर होत असला तरी मराठी भाषेला तितकेच महत्व आहे. अलिकडेच मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त झालेला आहे. विद्यार्थ्यांनी जीवनात ध्येय निश्चित करुन पुस्तकांशी मैत्रीपूर्ण जवळीक प्रस्थापित केली पाहिजे. पुस्तके व ग्रंथ हे विद्यार्थ्यांसाठी एक विद्यारुपी शस्त्र आहे असे सांगून भारतीय राज्यघटेनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर, मिसाईल मॅन डॉ. एपीजे अब्दुल कलाम, कवी कुसुमाग्रज यांच्यासारख्या महापुरुषांचे विचार आत्मसात करुन विद्यार्थ्यांनी आपली पुढील वाटचाल करावी असे त्यांनी यावेळी सांगितले.
श्रीमती पोटूडे म्हणाल्या, विद्यार्थ्यांनी वाचन संस्कृतीची जोपासणा करावी. विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतांना आपले ध्येय निश्चित करुनच पुढचे पाऊल उचलावे, जेणेकरुन आपले भविष्य उज्ज्वल होईल. विद्यार्थी मित्रांनो ‘वाचाल तर वाचाल’ असा कानमंत्रही त्यांनी दिला. मुली ह्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंच्या लेकी आहेत, त्यांनी आपल्या आई-वडिलांचे संकल्प पूर्ण केले पाहिजे. विद्यार्थ्यांनी पुढारी व महापुरुषांच्या गाथा अंगिकारल्या पाहिजे असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा ग्रंथालय अधिकारी मिनाक्षी कांबळे यांनी केले. त्यांनी आपल्या प्रास्ताविकातून सांगितले की, उच्च व तंत्र शिक्षण विभागाद्वारे राबविण्यात येणाऱ्या ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ हा उपक्रम 1 ते 15 जानेवारी 2025 या कालावधीत राबविण्याचे जाहीर करण्यात आले असून त्याचाच एक भाग म्हणून आज ग्रंथप्रदर्शनीचा उद्घाटन कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. त्यामुळे नागरिक, वाचक, सभासद, विद्यार्थी, अभ्यासक यांनी मोठ्या संख्येने या उपक्रमात सहभागी व्हावे असे सांगून वाचन पंधरवाड्यानिमीत्त सामुहिक वाचन, वाचन कौशल्य, कार्यशाळा, वाचन संवाद, पुस्तक परिक्षण व कथन स्पर्धा, ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन व सदर कालावधीत अधिकाधिक विद्यार्थ्यांची सभासद नोंदणी यासारख्या उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. यानिमीत्त विद्यार्थ्यांची सभासद नोंदणी मोहीम राबविली जाणार आहे असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन करुन उपस्थितांचे आभार ग्रंथालय निरीक्षक अस्मिता मंडपे यांनी मानले. कार्यक्रमास नागरिक, वाचक, सभासद, विद्यार्थी व अभ्यासक मोठ्या संख्येने उपस्थित होते.