विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे गोंदिया जिल्हा अधिवेशन
गोंदिया : शासनाने निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील लाडक्या बहिनींसाठी ४६ हजार कोटींची तरतूद करून त्यांना लाभ दिला. पण, उद्याचे भविष्य घडविणारे आमचे राज्यातील शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी हे टप्पा वाढ अनुदान मंजूर करण्यासाठी फक्त ९२६ कोटींची तरतूद मागते आहे, जुनी पेन्शन योजना मागते आहे, त्यांच्यासाठी सरकारकडे पैसे नाही, ही शोकांतिका आहे, अशी टीका विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सरकार्यवाह तथा आमदार सुधाकर अडबाले यांनी केली.
विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ गोंदिया जिल्हातर्फे शिवराम विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय, मरामजोब (ता. देवरी, जि. गोंदिया) येथे ५ जानेवारी २०२५ रोजी गोंदिया जिल्हा अधिवेशन पार पडले. त्याप्रसंगी उद्घाटक म्हणून आमदार सुधाकर अडबाले बोलत होते.
अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार व्ही. यू. डायगव्हाणे होते. स्वागताध्यक्ष म्हणून प्राचार्य डी. एस. हुकरे सर होते. याप्रसंगी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष अरविंद देशमुख, जगदीश जुनगरी, महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचे राज्याध्यक्ष वितेश खांडेकर, विमाशि संघाचे प्रांतीय उपाध्यक्ष रमेश काकडे, विभागीय कार्यवाह चंद्रशेखर रहांगडाले, गोंदिया विज्युक्ताचे अध्यक्ष पवन कटरे, अरविंद शरणागत, प्रभाकर वऱ्हाटे सर, चंद्रपूर महानगर कार्यवाह सुरेंद्र अडबाले, गोंदिया जिल्हा अध्यक्ष ओमप्रकाश गुप्ता, जिल्हा कार्यवाह संदीप मांढरे, भोजराज फुंडे, धनराज राऊत, प्राचार्य जी. एम. मेश्राम, प्राचार्य महेंद्र मेश्राम, प्राचार्य रजिया बेग, मुख्याध्यापक एस. बी. दुबे, प्राचार्य विनोद गिरीपुंजे, योगिनी हूकरे मॅडम, चुटे मॅडम, मुनघाटे मॅडम, रतन वासनिक व मोठ्या संख्येने प्राचार्य, मुख्याध्यापक, प्राध्यापक, शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.प्रारंभी मान्यवरांचे गोंडी नृत्याने स्वागत करण्यात आले. याप्रसंगी माजी आमदार डायगव्हाणे सर, अरविंद देशमुख, रमेश काकडे, वितेश खांडेकर, भोजराज फुंडे, पवन कटरे, प्राचार्य डी. एस. हुकरे आदींनी शिक्षण क्षेत्रातील समस्यांवर प्रकाश टाकला.
पुढे बोलतांना आमदार सुधाकर अडबाले म्हणाले, “शिक्षक हे समाजाचे आधारस्तंभ आहेत. याच शिक्षकांनी मला मतदानरुपी आशीर्वाद देऊन सभागृहात पाठविले. त्यामुळे त्यांचे हक्क व न्याय कायम राखणे ही माझी जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून जबाबदारी आहे. शिक्षकांच्या रास्त समस्या सोडवण्यासाठी मी अविरत सभागृहात आवाज उठवत राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.याप्रसंगी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षकांचा शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
प्रास्ताविक विमाशि संघ जिल्हा अध्यक्ष ओमप्रकाश गुप्ता यांनी केले. अहवाल जिल्हा कार्यवाह संदीप मांढरे यांनी वाचन केले. संचालन राजेश देशपांडे, दिलीप ढवळे यांनी तर आभार बारसे सर यांनी मानले. अधिवेशन यशस्वी करण्यासाठी शिवराम विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक, कर्मचारी, विमाशी संघ जिल्हा, तालुका पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.