नागपूर, दि. 10 जानेवारी: ‘केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे’ या उक्तीला प्रत्यक्ष कृतीत आणुन विदर्भातील पहिला शंभर टक्के ‘सौरग्राम’ होण्याचा मान आता लवकरच वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील चिचघाट-राठी या गावाला मिळणार आहे. सौर ऊर्जेच्या प्रकाशात झळकणा-या या गावाने शासकीय निधीची कुठलीही मदत न घेता हि किमया साध्य करणा-या या गावाने संपुर्ण राज्यापुढे एक आदर्श निर्माण केला आहे. महावितरणकडून राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यातील किमान 2 गावे 100 टक्के सौर ऊर्जेवर नेण्याची मोहीम सुरु असून या मोहिमेंअर्गत चिचघाट-राठी या गावाची निवड करण्यात आली असून गावातील सौर ऊर्जेची स्थापित क्षमता सुमारे 811 किलोवॅट झाली आहे.
वर्धा शहरापासून 40 किमीच्या अंतरावर असलेले आणि महावितरणच्या हिंगणघाट (ग्रामिण) उपविभागा अंतर्गत असलेल्या चिचघाट-राठी या गावाचे हवामान वर्षभर कोरडे असते. उन्हाळ्यात अतिउष्ण असते. मे हा अतिउष्णतेचा असल्याने सोबतच जवळपास वर्षभर असलेल्या स्वच्छ सुर्यप्रकाशाचा वापर करून वीज निर्मिती करणाच्या मानस करित येथील गावक-यांनी महावितरणच्या अवाहनाला अनुकुल प्रतिसाद देत केंद्र शासनाच्या ‘पंतप्रधान सुर्यघर’ – मोफ़त वीज योजनेत सहभागी होत गावाचे शंभर टक्के सौर ऊर्जीकरण करुन एकजुटीने ‘सौर’ उड्डाणाकडे यशस्वी प्रवास सुरु केला आहे.
गावामध्ये घरगुतीच्या 70, औद्योगिक 4, वाणिज्यीक 1, यासोबतच अंगनवाडी, जिल्हा परिषद शाळा, पथदिवे आणि सार्वजनिक पाणी पुरवठा यासारख्या वीज जोडणी असलेल्या ग्राहकांनी छतावर सौर निर्मिती प्रकल्प उभारून पर्यावरणपुर्वक वीज निर्मिती सुरु केली आहे. घरगुती श्रेणीतील 70 ग्राहकांपैकी तब्बल 65 ग्राहकांनी स्वयंस्फुर्तीने बँकेकडून कर्ज घेत, 2 ग्राहकांनी स्वखर्चाने तर उर्वरित ग्राहकांना पी व्ही टेक्सटाईल्स या उद्योगाने दत्तक घेत सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारले आहे. बॅंकेकडून कर्ज घेणा-या 65 ग्राहकांपैकी तब्बल 50 ग्राहकांना बँक ऑफ़ बडोदाने कर्जपुरवठा केला आहे.
मुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस, महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रा, संचालक (संचालन) अरविंद भादीकर, संचालक (प्रकल्प) श्री प्रसाद रेशमे यांच्या निरंतर मार्गदर्शनात आणि प्रादेशिक संचालक, नागपूर परेश भागवत, कार्यकारी संचालक (विशेष प्रकल्प) धनंजय औंढेकर, नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके, वर्धा मंडलाच्या अधीक्षक अभियंता श्रीमती स्मिता पारखी यांच्या विशेष पुढाकाराने हिंगणघाट विभागाचे कार्यकारी अभियंता हेमंत पावडे, उपकार्यकारी अभियंता प्रशांत तेलतुमडे, उपविभागीय अभियंता प्रविण तुरणकर, सहायक अभियंता अंकुश चहांदे आणि वरिष्ठ तंत्रज्ञ राजेंद्र उगे यांच्या अविरत प्रयासाने चिचघाट-राठी या गावाला विदर्भातील पहिले सौरग्राम होण्याचा बहुमान मिळाला आहे.
चिचघाट-राठीच्या सरपंच श्रीमती सीमा बेवडे, माजी सरपंच राजेश कोचर, उद्योगपती वरूण राठी आणि रितेश सुराणा, बँक ऑफ़ बडोदाचे चेतन वंजारी आणि विनित विवेक महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता पंकज फ़ाळे यांनी या गावाचे शंभर टक्के सौर ऊर्जीकरणासाठी विशेष प्रयत्न केले. गावक-याना सुलभ कर्ज मिळावे यासाठी त्यांचे आधार कार्ड, पॅन कार्ड अपडेट करणे, क्रिसील रेटींग़्ज खराब असलेल्यांना मदत करुन कर्ज मिळविण्यासाठी परिपुर्ण मदत करणारे, बॅकेकडे सातत्याने पाठपुरावा करणारे महावितरणच्या हिंगणघाट विभागिय कार्यालयातील उप व्यवस्थापक (वि व ले) विलास चतारे आणि उपविभागिय कार्यालयातील सहायक लेखापाल मयुर बिनोने, गावातील गृहिणींसोबत प्रत्यक्ष संवाद साधून त्यांना सौर ऊर्जेचे महत्व समजावून सांगत त्यांना या योजनेत सहभागी होण्यास प्रवृत्त करना-या सहायक अभियंता कुमारी श्रीनिधी धुर्वे आणि श्रीमती निशिगंधा डवरे यांणि देखिल विशेष प्रयत्न केले.चिचघाट-राठी या गावाचा आदर्श घेत इतर गावांनी देखील त्यांचे गाव शंभर टक्के सौरग्राम करण्यास पुढाकार घेण्याचे आवाहन महावितरणतर्फ़े करण्यात आले आहे.