गोंदिया : तिरोडा तालुक्यात रेतीघाटाचा लिलाव झाला नसला तरी मोठ्या प्रमाणात अवैधरीत्या रेतीचे उत्खनन व वाहतूक होत असल्याच्या अनेक तक्रारी नागरिकांनी तिरोडा महसूल विभागाकडे केल्या होत्या. मात्र महसूल विभाग याकडे लक्ष देत नसल्याने नागरिकांच्या तक्रारीवरून गोंदिया जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांनी 11 जानेवारी रोजी छापा मारून सात पोकलैंड, चार टिप्पर व 6500 ब्रास रेती जप्त केली.
तिरोडा तालुक्यातील वैनगंगा नदीवरील रेतीघाटावरून 24 तास अवैधरीत्या रेतीचे उत्खनन व वाहतूक होत असल्याच्या अनेक तक्रारी नागरिकांनी तिरोडा महसूल व पोलीस विभागाकडे केल्या होत्या. मात्र यावर कुठलीही कारवाई होत नसल्याने नागरिकांनी 11 जानेवारी रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारी केली. त्यावरून गोंदियाचे जिल्हाधिकारी प्रदीप नायर व जिल्हा पोलीस अधीक्षक गोरख भांमरे यांनी घाटकुरोडा घाटावर धडक दिली. माहिती मिळताच तिरोडा महसूल विभाग खडबडून जागा जागा झाला. तहसीलदार नारायण ठाकरे, नायब तहसीलदार मोहोरकर, मंडळ अधिकारी, तलाठी श्रीमती पटले, आनंद भुते, सुजीत पवार, तहसील कार्यालयाचे लिपिक कुर्वे, ठाकरे, महसूल सेवक, तिरोडा पोलीस निरीक्षक अमित वानखडे यांनी आपल्या ताफ्यासह घटनास्थळी धाव घेऊन जिल्हाधिकाऱ्यांसमक्ष घाटकुरोडा घाट क्रमांक एक, घाट क्रमांक दोन व पाटील टोला येथील साठवणूक डेपोमधून अवैधरीत्या रेतीवाहतूक व उत्खनन करणारे सात पोकलैंड, चार टिप्पर व 6500 ब्रास रेतीसाठा जप्त केला. या कारवाईने तिरोडा महसूल विभागाला चांगलीच चपराक बसल्याची चर्चा सर्वत्र होत आहे.