*शिक्षण हक्क व संविधान परिषद उत्साहात
गोंदिया ता. 25 :- इतर प्रगत देशांच्या तुलनेत भारतीय शैक्षणिक गुंतवणूक अतिशय कमी म्हणजे अडीच टक्के आहे.तेव्हा शिक्षणाचे आर्थिक कुपोषण सरकारने थांबविले पाहिजे असे आवाहन पुणेचे शिक्षण बचाव समन्वय समितीचे अध्यक्ष शरद जावडेकर यांनी (ता. 25) केले.येथील जैन कुशल भवन येथे दोन दिवसीय आयोजित शिक्षण हक्क व संविधान परिषदेच्या प्रथम सत्रात अध्यक्ष पदावरून श्री जावडेकर बोलत होते.
मंचावर कार्यक्रमाचे उदघाटक आणि अर्थतज्ज्ञ श्रीनिवास खांदेवाले, डॉ. संतोष सुरडकर, वसंतराव गवळी उपस्थित होते.
श्री जावडेकर पुढे बोलताना म्हणाले की,राष्ट्रीय उत्पन्नाच्या प्रमाणात शिक्षणावर किती खर्च व्हावं यावर विचार होणे गरजेचे आहे. त्यांनी भारतीय संविधानाची जोरदार प्रशंसा केली ते म्हणाले,मनुस्मृतीचे संविधान नाकारून स्वातंत्र्य, समता, न्याय बंधुभाव,तसेच धर्मनिरपेक्ष आणि विज्ञाननिष्ठ संविधान लागू झालं. शिक्षणाची रचना कशी असावी याचं उत्तर याच संविधानात सामावलं आहे.समान संधी असेल तरच समता निर्माण होईल परंतु राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातून अंधश्रद्धा निर्माण करणारी शैक्षणिक व्यवस्था निर्माण करण्यात आली आहे. यावर त्यांनी चिंता व्यक्त केली. जिकडे तिकडे दहशतीचं वातावरण असतांना गोंदियात शिक्षण परिषद आयोजित करण्यात आल्याने आयोजकांचे त्यांनी कौतुक केले.

याप्रसंगी उदघाटक श्री खांदेवाले यांनीही विचार मांडले, ते म्हणाले की, स्वातंत्र्यपूर्वी देशात साम्राज्यशाही होती. ही संपूस्टात येऊन लोकशाही नांदावी यासाठीच भारतीय संविधान लिहिण्यात आलं. या देशात सरकारची भूमिका कशी असावी यासाठी संविधानात नितिनिर्देशक तत्वे नमूद असून हे तत्व विचारात घेऊन सरकारने पाऊल उचलले पाहिजे. डॉ सुरडकर म्हणाले की,सत्ताधारिवर्ग भांडवलशाही वाढवत आहे. यामुळे भारताची लोकशाही शैवाळ सारखी झाली आहे. तीला पाळेमुळे नाहीत. पारंपरिक भांडवलदार वर्ग भारतात असल्यामुळे परिवर्तन होऊ शकला नाही. त्यामुळे भारतीय समाजाला शिक्षण नाकारण्यात आलं. हा वर्ग बदलणे आवश्यक होतं. कारण हा जातीवर्ग समता सूचक नसून विषमतावादी आहे. आपण डोळस पणे न पाहता जाती आधारित कृती करू लागलो.त्यामुळे समाजाचं मोठं नुकसान झालं,असे ते म्हणाले
संविधानाच्या उद्देशीकेचे वाचन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.
संविधान जागृती अभियान अंतर्गत शिक्षण बचाव शाळा बचाव मोहीम राबविण्यात येत आहे. कार्यक्रमाचे संचालन ऍड.नरेश शेंडे यांनी तर आभार प्रा. डॉ. दिशा गेडाम यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गोंदिया जिल्हा शिक्षण बचाव समन्वय समिती चे अध्यक्ष वसंतराव गवळी, समन्वयक आदेश गणवीर, संयोजक अतुल सतदेवे, सर्व समाज विचार मंच आणि तालुका समन्वयक यांनी सहकार्य केले.