- जिल्हा नियोजन आढावा
गोंदिया, दि.25 : जिल्हा नियोजन समिती मार्फत करावयाच्या विविध विकास कामाचा निधी अंमलबजावणी यंत्रणांनी गुणवत्तापूर्ण कामांसह निर्धारित वेळेत खर्च करावा, असे निर्देश राज्याचे सहकार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिले.जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात आज (दि.25) जिल्हा नियोजन समितीची सभा आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते.
सभेला खासदार डॉ.नामदेव किरसान, जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर, आमदार सर्वश्री राजकुमार बडोले, विनोद अग्रवाल, विजय रहांगडाले, संजय पुराम, जिल्हाधिकारी प्रजित नायर, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरुगानंथम, पोलीस अधीक्षक गोरख भामरे, उपवनसंरक्षक प्रमोदकुमार पंचभाई, नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्राचे उपसंचालक पवन जेफ, नियोजन विभागाचे उपायुक्त अनिल गोतमारे, जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल धोंगडे, निमंत्रित सदस्य व विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत मागील सभेच्या इतिवृत्तावर सविस्तर चर्चा करून ते कायम करण्यात आले. इतिवृत्तातील जि.प. शाळेच्या क्रीडांगणासाठी/व्यायामशाळांना देण्यात येणारा निधीचा मुद्याही या बैठकीत चर्चेला आला. शाळेच्या क्रीडांगणासाठी मागणी केलेल्या सर्व प्रस्तावांना स्थगिती देण्यात येत असून सर्व प्रस्ताव नव्याने मागविण्यात यावे. जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांनी निधी मंजूर करतांना जिल्ह्यातील संपूर्ण तालुक्यात सम प्रमाणात निधी वाटप करावा असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. लाख लागवडीसाठी जिल्हाभर नियोजन करावे असे बैठकीत सांगण्यात आले.
जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजना, अनुसूचित जाती उपयोजना, आदिवासी उपयोजना व आदिवासी क्षेत्र बाह्य योजना सन २०२४-२5 मध्ये यंत्रणांनी तिन्ही योजनांवर आतापर्यंत 45 टक्के निधी खर्च झालेला आहे.
जलजीवन मिशन अंतर्गत ग्रामीण पाणी पुरवठ्याच्या सर्व योजना सोलरवर आणाव्यात असे निर्देश पालकमंत्री यांनी यावेळी दिले. सोबतच अर्धवट योजना लवकरात लवकर पूर्ण करण्याबाबतही त्यांनी संबंधित विभागाला सूचना केल्या. गडकिल्ले व पर्यटन यावरील निधी तातडीने खर्च करण्यासाठी नियोजन करण्याच्या सूचना पालकमंत्री यांनी दिल्या. जिल्ह्यातील सर्वच विधानसभा क्षेत्रात डिजीटल शाळा उभारण्यासाठी सर्वानुमते मंजूरी देण्यात येत आहे असे पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
यासोबतच या बैठकीत जिल्हा विकासाच्या विविध मुद्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. गोंदिया शहरात घनकचरा व्यवस्थापन प्रक्रिया प्रकल्पासाठी निधी मिळावा अशी मागणी यावेळी करण्यात आली.
ओबीसी वसतिगृहाबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. जागा उपलब्ध झाली असून निधीसाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात यावा अशा सूचना पालकमंत्र्यांनी केल्या. शासनाच्या योजना जिल्ह्यातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचविण्यासाठी अंमलबजावणी यंत्रणांनी प्रत्येक योजना लोकाभिमुख करावे अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या.
जन सुविधा व नागरी सुविधा अंतर्गत कामे, सनद वाटप, सौर ऊर्जा योजना, जळालेले ट्रान्सफार्मर दुरुस्त करणे, जि.प. शाळेच्या जीर्ण इमारती, प्रत्येक तालुक्यात नाट्यगृह उभारणी, नवेगावबांध पर्यटन विकास, अर्जुनी मोरगाव तालुक्यातील इंजोरी उत्तारवाहिनी व कोहलगाव दुर्गामाता तीर्थक्षेत्राचा विकास तसेच तिरोडा तालुक्यातील पोंगेझरा बोळूंदा तीर्थक्षेत्राचा विकास, ढासगड व हाजराफॉल पर्यटनस्थळाचा विकास, दलित वस्ती सुधार योजना, प्रतापगड यात्रेसाठी शासकीय निधी, शेती करण्यासाठी पाण्याचे स्त्रोत, आदिवासी बांधवांकरीता समाज भवन उभारण्यासाठी जागा उपलब्ध करुन द्यावी तसेच जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात नाट्यगृह उभारण्यात यावे आदी विषयांवर यावेळी चर्चा करण्यात आली.
यावेळी नुकतेच आयुध निर्माण फॅक्टरी भंडारा/जवाहरनगर येथे झालेल्या भिषण स्फोटात मृत्यू झालेल्या नागरिकांना श्रध्दांजली अर्पण करुन 2 मिनिटे मौन पाळण्यात आले.
जिल्हा नियोजन समिती सभा 14 ऑगस्ट 2024 च्या इतिवृत्तास या बैठकीत मंजूरी देण्यात आली. जिल्हा वार्षिक योजना सन 2024-25 अंतर्गत माहे डिसेंबर 2024 अखेर झालेल्या (सर्वसाधारण योजना, अनुसुचित जाती उपयोजना, आदिवासी उपयोजना, आदिवासी उपयोजना बाहयक्षेत्र) खर्चाचा आढावा घेण्यात आला. जिल्हा वार्षिक योजना सन 2025-26 अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या (सर्वसाधारण योजना, अनुसुचित जाती उपयोजना, आदिवासी उपयोजना, आदिवासी उपयोजना बाहयक्षेत्र) प्रारुप आराखड्यास मान्यता देण्यात आली व अध्यक्ष महोदयांचे परवानगीने वेळेवर येणाऱ्या विषयावर चर्चा झाली.सभेचे संचालन जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल धोंगडे यांनी केले, उपस्थितांचे आभार सहायक जिल्हा नियोजन अधिकारी उत्तम शेट्टे यांनी मानले.