नागरिकांनो ‘जीबीएस’ आजाराला घाबरु नका, पण सतर्क रहा !

0
196

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन वानखेडे यांचे आवाहन

       गोंदिया, दि.31 : राज्यात काही ठिकाणी गुईलेन बॅरे सिंड्रोम (जीबीएस) या आजाराचे रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे जिल्हा आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. हा आजार नवीन नाहीत्यामुळे नागरिकांनी घाबरुन जाऊ नये. या आजाराबाबत स्वतःची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन वानखेडे यांनी केले आहे.

          जीबीएस या आजाराचा रुग्ण उपचारानंतर पूर्णपणे बरा होऊ शकतो. काही जणांना दीर्घकाळ त्रास जाणवू शकतो. कुठलीही लक्षणे जाणवू लागताच नागरिकांनी घाबरुन न जाता डॉक्टरांकडून उपचार घेण्याचे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अमरिश मोहबे यांनी केले आहे.

          सदर आजार हा ऑटोइम्यून आजार असून यामध्ये शरीराची रोगप्रतिकारशक्ती स्वतःच्या चेतनासंस्थेवर हल्ला करते. त्यामुळे स्नायू कमजोर होतात आणि गंभीर रुग्णांमध्येच पक्षाघातही होऊ शकते, अशी माहिती सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अरविंदकुमार वाघमारे यांनी दिली. जीबीएस हा आजार एखाद्या श्वसन किंवा पचनसंस्थेच्या संसर्गानंतर होतो. त्यावर तातडीने उपचार करणे गरजेचे असते. हा आजार दूषित पाण्यामुळे आणि न शिजवलेले अन्न खाल्ल्यामुळे होतो. त्यामुळे अशाप्रकारचे अन्न टाळावे तसेच पाणी उकळून पिण्याबाबतचे आवाहन जिल्हा साथरोग अधिकारी डॉ.निरंजन अग्रवाल यांनी केले आहे.

      आजाराची सर्वसाधारण लक्षणे : अचानक पायातील किंवा हातात येणारी कमजोरी/लकवा. हात-पायांमध्ये अचानक अशक्तपणा जाणवणे. अचानकपणे उद्भवलेला चालण्यातील त्रास किंवा कमजोरी. हातापायांना मुंग्या येणे. डायरिया (जास्त दिवसांचा)/अतिसार. बोलण्यास किंवा अन्न गिळण्यास त्रास. श्वास घेण्यास त्रास होणे इत्यादी या आजाराची लक्षणे आहेत.

      नागरिकांनी घ्यावयाची काळजी : पिण्याचे पाणी दूषित राहणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. उदा. पाणी उकळून घेणे. अन्न स्वच्छ आणि ताजे असावे. वैयक्तिक स्वच्छतेवर अधिक भर देण्यात यावा. शिजलेले अन्न आणि न शिजलेले अन्न एकत्रित न ठेवल्यासही संसर्ग टाळता येईल.

खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांनी जीबीएस रुग्ण आढळून आल्यास त्वरित शासकीय आरोग्य यंत्रणांना कळवावेया आजाराची लक्षणे आढळल्यास नागरिकांनी घाबरून न जाता त्वरित शासकीय रुग्णालयाशी संपर्क साधावा.