गोंदिया,दि.०४ः- राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत आरोग्य विभाग प्रशासन, राष्ट्रीय आरोग्य अभियान, के.टी.एस.सामान्य रुग्णालय यांच्या एकत्रित सहकार्याने जागतिक कर्करोग दिनाच्या अनुषंगाने दि.४ फेब्रुवारी रोजी मंगळवारी हा दिवस जिल्हास्तरावर केटीएस शासकिय सामान्य रुग्णालय येथील परिसरात साजरा करुन शासनाची शंभर दिवसाची कर्करोग तपासणी व जनजागृती मोहिमेचे जिल्हास्तरीय उद्घाटन ह्या दिवसाच्या अनुशंगाने करण्यात आले.
जिल्हास्तरीय या कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अमरिश मोहबे, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अरविंद वाघमारे,शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ.बागडे,सहाय्यक जिल्हा शल्यचिकिस्तक डॉ.तृप्ती कटरे,वैद्यकीय अधिकारी डॉ.अजय घोरमारे, डॉ.गुरुप्रकाश खोब्रागडे,डॉ.भारती जयस्वाल,डॉ.अनिल आटे,डॉ.सुवर्णा हुबेकर,कानुरामजी अग्रवाल, शरद क्षत्रीय यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाचे जिल्हा समन्वयक डॉ.स्नेहा वंजारी यांनी प्रास्तविक करताना जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक सूचनानुसार यावर्षी हा दिवस “युनायटेड बाय युनिक” या संकल्पनेवर साजरा करण्यात येत आहे.या दिनाच्या अनुषंगाने राज्यातील 30 वर्ष वयोगटापेक्षा अधिक सर्व नागरिकांकरिता आरोग्य मोहीम राबवून विनामूल्य कर्करोग आरोग्य सेवा देण्यात येणार आहेत.सदर मोहिमेकरता राज्य शासनाने “एकजूट होऊया,कर्करोगाला हरवू या“हे घोषवाक्य निश्चित केले जिल्ह्यात शंभर दिवसाच्या अनुशगांनी कर्करोग तपासणी व जनजागृती मोहिम राबविण्यात येणार असल्याची सांगितले.
कर्करोग हा आता एक सामान्य आजार झाला असुन प्राथमिक स्तरावर ओळखला गेल्यास नियंत्रण करता येवु शकतो.त्यामुळे त्याबद्दल प्रत्येकाला माहिती असणे गरजेचे आहे की नक्की कर्करोग आहे तरी काय? आपलं शरीर हे पेशींनी बनलेलं असतं आणि शरीराचा विकास हा पेशी दुभंगल्यानेच होतो. जोवर आपण 18 वर्षांचे होतो तोवर ह्या पेशी अरबो वेळा दुभंगल्या जातात. पेशींचं हे विभाजन एका रचनेनुसार होतं असतं आणि ते नियंत्रणात असतं. कर्करोगाचा आजारही याच पेशींच्या विभाजनामुळे होतो. पेशींचे विभाजन हे आपल्या शरीराच्या विकासासाठी अतिशय गरजेचे आहे, पण हे विभाजन नियंत्रणात रहायला हवे. जर हे विभाजन नियंत्रणाबाहेर गेले की माणूस कर्करोगाला बळी पडत असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अमरिश मोहबे यांनी अध्यक्षिय भाषणेत माहीती दिली.
राज्यातील प्रामुख्याने कर्करोग सदृश आणि कर्करोग बाधित रुग्णांना योग्य निदान आणि कर्करोग उपचार देण्याकरिता सर्व आरोग्य संस्थांमध्ये उपलब्ध असलेल्या आरोग्यसेवा जसे की कर्करोग तपासणी, कर्करोग निदान आणि कर्करोग उपचार शस्त्रक्रिया जसे किमोथेरपी व रेडिएशन या आजाराबाबत जनजागृती मोहीम राबवून आरोग्य सेवा देण्यात येणार असल्याचे सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अरविंदकुमार वाघमारे यांनी या प्रसंगी माहीती दिली.
कॅन्सर अर्थात कर्करोग आजही जगासमोरील एक जीवघेणी समस्या आहे.हजारो लोक दरवर्षी कर्करोगामुळे मृत्यू पावतात.पहिल्यांदा जेव्हा कर्करोगाचा जगाशी सामना झाला तेव्हा एक समज निर्माण झाला की जे धुम्रपान करतात त्यांनाच कर्करोग होतो किंवा तंबाखू खाल्ल्यानेच कर्करोग होतो. पण हळूहळू पोटाचा कर्करोग, स्तनांचा कर्करोग आणि अन्य कर्करोग जगासमोर उलगडू लागले आणि हे सत्य समोर आले की कर्करोग कोणालाही आणि कसाही होऊ शकतो आणि तेव्हापासून कर्करोगाची जास्त भीती निर्माण झाली.सगळ्यात भयानक गोष्ट म्हणजे कधी कधी कर्करोग शरीरात असूनही कळत नाही. पण जस जशी वर्षे लोटली तस तसे विज्ञान प्रगत झाले आणि आता कर्करोगापासून वाचवणारे उपचारही आलेत. पण तरी आजही जनमानसात कर्करोगाबद्दल जागरुकता नाही किंवा त्यांना त्याबद्दल काही माहिती नाही. त्याच दृष्टीने थोडी जागरुकता निर्माण करणे आवश्यक बनल्याची माहिती सहाय्यक जिल्हा शल्यचिकिस्तक डॉ.तृप्ती कटरे यांनी या वेळी दिली.
धूम्रपान, तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन, अति चरबीयुक्त आहार, विषारी रसायनांसोबत काम करणे किंवा निवासस्थानाच्या परिसरात अति रसायनांचा वापर, आनुवंशिकता, काही विषाणूंशी संपर्क आल्याने रोगप्रतिकारक शक्ती कमी होणे इ.कर्करोगाची प्रमुख कारणे आहेत. कर्करोग असणाऱ्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. देशात दरवर्षी सुमारे ११ लाख नागरिकांना कर्करोगाची बाधा होते व त्यातील सुमारे ५ लाख लोक या आजारामुळे बळी पडतात अशी माहीती जिल्हा मौखिक तज्ञ डॉ.अनिल आटे यांनी यावेळी दिली.
कर्करोग तपासणी व जनजागृती मोहिमेचे जिल्हास्तरीय उद्घाटन कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जिल्हा मौखिक आरोग्य अधिकारी डॉ.अनिल आटे यांनी केले तर आभार प्रदर्शन सामाजिक कार्यकर्ता संध्या शंभरकर यांनी केले.कार्यक्रम प्रसंगी दंत शल्य चिकित्सक डॉ.अमोल राठोड,जिल्हा सल्लागार डॉ.ज्योती राठोड,डॉ.स्वर्णा उपाध्याय,स्वाती पाटील,रेखा कानतोडे, भौतिकोपचार तज्ञ डॉ.कांचन भोयर,मनोवैज्ञानिक सुरेखा आझाद मेश्राम,दंत सहाय्यक विवेकानंद कोरे,जिल्हा माध्यम व विस्तार अधिकारी विजय आखाडे,जिल्हा आईसी अधिकारी प्रशांत खरात यांचे सह बाई गंगाबाई स्त्री रुग्णालयातील नर्सिंग कॉलेजने विद्यार्थी,रिलायन्स रुग्णालयाचे कँसर विभागातील डॉक्टर,अशासकीय संस्थेचे कर्मचारी,केटीएस विभाग व राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा कार्यक्रम समन्वयक,आरोग्य विभागातील अधिकारी व स्टाफ नर्स प्रामुख्याने उपस्थित होते.