अमरावती दि.5 फेब्रुवारी – शासकीय गायरान जमिनीवर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत (मग्रारोहयो) चारा लागवड करून दुग्धोत्पादनाला चालना देण्याचा महत्त्वपूर्ण उपक्रम दर्यापूर तालुक्यातील टोंगलाबाद येथे सुरू झाला आहे. कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष अॅड. निलेश हेलोंडे पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे हा उपक्रम साकारला आहे.
टोंगलाबाद येथे ग्रामपंचायत, पंचायत समिती दर्यापूर, पशुसंवर्धन विभाग आणि गटविकास अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने या उपक्रमाचा शुभारंभ झाला. यावेळी सरपंच वैशाली पानझाडे, गटविकास अधिकारी सी. जे. ढवके, पशुसंवर्धन विभागाचे सहायक उपायुक्त डॉ. बोडखे, पशुधन विकास अधिकारी डॉ. निचड यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.
दोन हेक्टरवर चारा उत्पादन: टोंगलाबाद येथील दोन हेक्टर शासकीय गायरान जमिनीवर हिरव्या चाऱ्याची लागवड करण्यात आली आहे. यामधून सुमारे 650 टन चारा उत्पादन होईल, असा अंदाज आहे. याव्यतिरिक्त, पुढील तीन महिन्यांत आणखी चारा उपलब्ध होणार आहे. या उपक्रमांतर्गत दर्यापूर तालुक्यातील 74 ग्रामपंचायतींना हिरव्या चाऱ्याचे थांबे (रोपे) पुरवले जाणार आहेत.
राज्यातील 14 जिल्ह्यांसाठी आदर्श: कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनच्या माध्यमातून राज्यातील 14 जिल्ह्यांमध्ये हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. टोंगलाबाद येथील प्रकल्प इतर जिल्ह्यांसाठी आदर्श ठरणार आहे, असे अॅड. निलेश हेलोंडे पाटील यांनी सांगितले.
शेतकरी समृद्धीचा मार्ग: या उपक्रमामुळे जनावरांना पुरेसा चारा मिळेल, दुग्ध उत्पादन वाढेल आणि शेतकऱ्यांचे उत्पन्नही वाढेल. यामुळे शेतकऱ्यांच्या समृद्धीचा मार्ग प्रशस्त होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.