धार्मिक एकोपा जपत तिर्थक्षेत्र संवर्धनाच्या दिशेने पाऊल टाकावे-ललित गांधी 

0
25
तिर्थक्षेत्र शिरपूर येथे भेट व दर्शन
जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक
तीर्थक्षेत्राचा ऐतिहासिक वारसा : जागतिक दर्जासाठी आपण सर्व मिळून प्रयत्न करूया
वाशिम, दि. १८ फेब्रुवारी– जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष व राज्य अल्पसंख्यक आयोगाचे सदस्य (राज्यमंत्री दर्जा) ललित गांधी यांनी दि.१७ फेब्रुवारी रोजी वाशिम जिल्ह्याचा दौरा केला.
दौऱ्याच्या प्रारंभी त्यांनी अंतरिक्ष पार्श्वनाथ तीर्थक्षेत्र येथे भेट देऊन दर्शन घेतले. त्यानंतर दिगंबर संत सिध्दांत सागरजी आणि श्वेतांबर संत पंन्यास विमलहंस विजयजी यांची भेट घेऊन धार्मिक आणि समाजहिताच्या दृष्टीने संवाद साधला.
यानंतर जिल्हाधिकारी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत शिरपूर जैन (जैनांची काशी) येथील प्राचीन मंदिराच्या दुरुस्तीसंदर्भात विशेष चर्चा झाली.धार्मिक एकोपा जपत तिर्थक्षेत्र संवर्धनाच्या दिशेने पाऊल टाकावे असे प्रतिपादन दि.१७ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील राजे वाकाटक सभागृहात आयोजित बैठकीत त्यांनी केले.या ऐतिहासिक मंदिराच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी आवश्यक उपाययोजनांवर श्री. गांधी यांनी भर दिला. मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी सरकारी स्तरावर सहकार्य मिळावे, यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.मंदिराच्या पवित्रतेचे जतन करणे आवश्यक असून, मंदिराचे ऐतिहासिक महत्त्व कायम ठेवण्यासाठी स्थानिक समुदायाने पुढाकार घ्यावा, असे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, जिल्हा पोलीस अधीक्षक अनुज तारे, उपविभागीय पोलिस अधिकारी नवदीप अग्रवाल यांची प्रमुख उपस्थिती होती‌.
जैन समाजाच्या ऐतिहासिक आणि धार्मिक दृष्टीने महत्त्वाच्या शिरपूर जैन (जैनांची काशी) येथे उद्भवलेल्या वादांची शांततापूर्ण सोडवणूक करावी, असे आवाहन जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी यांनी केले.
प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत झालेल्या चर्चेत श्री. गांधी यांनी सर्व संबंधित पक्षांनी सामंजस्याने आणि संवादाच्या माध्यमातून वाद मिटवावेत, अशी भूमिका मांडली. धार्मिक स्थळांचे जतन आणि समाजातील ऐक्य राखणे आवश्यक असून, संवाद व समंजसपणातूनच प्रश्न सोडवले पाहिजेत, असे त्यांनी स्पष्ट केले.
शिरपूर जैन येथील धार्मिक वारसा कायम ठेवण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याचे श्री.गांधी यांनी आवाहन केले.
शिरपूर जैन तीर्थक्षेत्राच्या ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्वाला अधिक ग्लोबल ओळख मिळवून ते जागतिक दर्जाचे तीर्थक्षेत्र बनवण्यासाठी जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी यांनी प्रगल्भ दृष्टीकोन व्यक्त केला.
श्री. गांधी यांनी  शिरपूर दौऱ्यात म्हटले की, शिरपूर जैन तीर्थक्षेत्र हे केवळ भारतामध्येच नव्हे, तर जागतिक पातळीवर एक प्रमुख धार्मिक स्थळ म्हणून विकसित होईल. त्यासाठी आवश्यक उपाययोजना, धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन तसेच अधिक पर्यटक आकर्षित करण्यासाठी योग्य पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील.
याशिवाय, जैन समाजाच्या आर्थिक व शैक्षणिक प्रगतीसाठी महामंडळाच्या विविध योजनांचा आढावा बैठकीत घेतला. या दौऱ्यामुळे जिल्ह्यातील जैन समाजाच्या विकासाच्या दृष्टीने सकारात्मक पाऊल टाकले गेले आहे. या भेटीदरम्यान गण्यमान्य व्यक्ती, स्थानिक भाविक आणि समाजबांधव उपस्थित होते.