गोंदिया : तिरोडा तालुक्यातील वन क्षेत्रात पावसाळ्यात करण्यात आलेल्या रोपवनाच्या कामात अनिमितता आढळल्याने याला जवाबदार मानून तिरोड्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी आर.जी.मून, सहाय्यक वन परिक्षेत्र अधिकारी शैलेंद्र पारधी, अब्दुल शकील अब्दुल दुरानी या तीन अधिकाऱ्यांवर वनसंरक्षक यांच्या आदेशावरुन उपवनसंरक्षक प्रमोद पंचभाई यांनी शुक्रवारी (दि.११) निलंबनाची कारवाई केली.
या कारवाईमुळे वन विभागात खळबळ उडाली असून आणखी काही अधिकारी रडारावर असल्याची माहिती आहे.
प्राप्त माहितीनुसार तिरोडा तालुक्यातील वनपरिक्षेत्रातील खैरलांजी १ मध्ये पावसाळ्यात रोप गट क्र. ५५९/२, ५६०/२ व ५६५/१ झुडपी जंगल क्षेत्र १३ हेक्टर, खैरलांजी २ रोपवनस्थळ गट क्र. ६३० व ६३७ झुडपी जंगल क्षेत्र ७, माल्ही रोपवन कक्ष ८८४ झुडपी जंगल गट क्र.२७० व २७१ क्षेत्र १० हेक्टर, परसवाडा भाग १ रोपवन स्थळ कक्ष क्र. ८९९ झुडपी जंगल गट क्र. ७५९, ७९२, ७९३ व ७८९ क्षेत्र १४ हेक्टर व इसापूर कक्ष क्र. ८९९ झुडपी जंगल गट क्र. ८७१ राखीव वन गट क्र. ९ व ६८.८९ क्षेत्र १० हेक्टरमध्ये सन २०२४ मध्ये पावसाळ्यात रोपवनाची कामे वन विभागाच्या माध्यमातून करण्यात आली हाेती. तसेच तिरोडा वनपरिक्षेत्रातील माल्ही रोपवन कक्ष ८८४ झुडपी जंगल गट क्र. २७० व २७१ क्षेत्र १० हेक्टरमध्ये सन २०२४ मध्ये पावसाळ्यात रोपवनाची कामे करण्यात आली होती. या कामांची जवाबदारी तिरोड्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी आर.जी.मून, सहाय्यक वन परिक्षेत्र अधिकारी शैलेंद्र पारधी,अब्दुल शकील अब्दुल दुरानी यांच्याकडे होती. या रोपवनाच्या कामात अनियमितता असल्याच्या तक्रारी वन विभागाला प्राप्त झाल्या होत्या. त्याचीच दखल घेवून वन विभागाचे याची चौकशी केली. चौकशीत अनियमितता आढळल्याने वनसंरक्षकांच्या आदेशावरुन त्यांच्यावर उपवनसंरक्षक प्रमोद पंचभाई यांनी ही निलंबनाची कारवाई केली. तीन अधिकाऱ्यांवर कारवाई झाल्याने वन विभागात खळबळ उडाली आहे. तर आणखी काही अधिकारी रडारावर असल्याची माहिती आहे.
वन्यप्राण्याच्या हल्ल्यात ठार झाल्याचे केले खोटे प्रकरण तयार
तिरोडा तालुक्यातील सोनेगाव येथील गोविंदा गोपी भगत यांचा झाडावरुन पडून मृत्यू झाला. परंतु या तीन अधिकाऱ्यांनी त्याचा रानडुक्कराच्या हल्यात मृत्यू दाखवून तसेच खोटे प्रकरण तयार करुन शासकीय रक्कमेचा अपहार केल्याचे चौकशीत पुढे आले. यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचे वन विभागाने म्हटले आहे.
“तिरोडा तालुक्यात वन क्षेत्रात पावसाळ्यात करण्यात आलेल्या रोपवनाच्या कामात अनियमितता तसेच वन्यप्राण्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याचे प्रकरण करुन शासकीय रक्कमेचा अपहार केल्याप्रकरणी या तीन अधिकाऱ्यांवर निलंबलनाची कारवाई करण्यात आली.”
>- प्रमोद पंचभाई, उपवनसंरक्षक, गोंदिया