सडक अर्जुनी : वनपरिक्षेत्र कार्यालय सडक अर्जुनी अंतर्गत येणाऱ्या सौंदड सहवनक्षेत्रातील गिरोला हेटी गावाजवळ एक बिबट मृतावस्थेत आढळल्याची घटना शनिवारी (दि.२२) सकाळच्या सुमारास उघडकीस आली.या बिबट्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे अद्याप स्पष्ट झाले नाही.
प्राप्त माहितीनुसार तालुक्यातील सौंदड अंतर्गत येणाऱ्या गिरोला हेटी येथील बस स्थानकापासून दहा मीटर अंतरावर एक बिबट मृतावस्थेत गावकऱ्यांना आढळला. गावकऱ्यांनी लगेच याची माहिती सडक अर्जुनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली. माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी पोहचून मृतक बिबट्याचा पंचनामा केला. तसेच सौंदड पशुवैद्यकीय अधिकारी यांनी बिबट्याची उत्तरीय तपासणी केली. मात्र या बिबट्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे अद्याप स्पष्ट झाले नाही. मृतक बिबट्याचा विसेरा तपासणीसाठी नागपूर येथे पाठविण्यात आला असून त्यांच्या अहवालानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होईल. या प्रकरणाचा पुढील तपास वनपरिक्षेत्र अधिकारी मिथुन तरोणे, सहवनक्षेत्र अधिकारी युवराज राठोड, वनरक्षक उंदीरवाडे हे करीत आहेत.