अहेरी : आलापल्ली ते अहेरी, आणि अहेरी ते व्यंकटरावपेठा या मुख्य रस्त्यांचे अर्धवट असलेले बांधकाम त्वरित पूर्ण करण्यासाठी माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार, काँग्रेस नेते हनुमंतू मडावी यांच्या नेतृत्वात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी आलापल्ली ते अहेरी या मुख्य मार्गावर दोन तास चक्काजाम आंदोलन केले. यावेळी आलापल्ली ते अहेरी रस्त्यावर दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
वरील दोन्ही रस्त्यांचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी गेल्या 17 फेब्रुवारी रोजी अजय कंकडालवार यांनी आलापल्ली सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन दिले होते. त्यात त्यांनी दिलेल्या कालावधीत रस्त्याचे काम पूर्ण न झाल्यास आंदोलन करण्याचा ईशारा दिला होता. मात्र परिस्थिती जशीच्या तशी असल्याने 28 फेब्रुवारी रोजी आलापल्ली ते अहेरी रस्त्यावरील बायपासजवळ कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत रस्ता रोको आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले.
सकाळी 11.30 वाजून हे आंदोलन सुरू झाल्यानंतर दोन्ही बाजुने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. अखेर अहेरीचे तहसीलदार बालाजी सोमवंशी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी तिथे येऊन रस्त्यांची कामे लवकर करून देण्याचे लेखी आश्वासन दिल्यावर हे आंदोलन मागे घेण्यात आले.